सहा सरपंच, ७० सदस्यपदांसाठी रविवारी मतदान!
By संतोष येलकर | Published: September 17, 2022 07:23 PM2022-09-17T19:23:50+5:302022-09-17T19:24:34+5:30
आठ ग्रामपंचायतींची निवडणूक: मतदान पथके रवाना, तयारी पूर्ण
अकोला: जिल्ह्यातील अकोट व बाळापूर या दोन तालुक्यांतील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत अकोट तालुक्यातील एक सरपंचांची अविरोध निवड झाली असून, एक सरपंच पदासाठी उमेदवारी अर्जच दाखल झाला नसल्याने दोन्ही तालुक्यातील सहा सरपंचपदांसह ग्रामपंचायतींच्या ७० सदस्य पदांसाठी रविवार, १८ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी मतदान पथके शनिवारी मतदान केंद्रांवर रवाना झाली असून, मतदानाची तयारी प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली आहे.
गेल्या जानेवारी २०२१ ते मे २०२१ आणि जून ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगामार्फत गेल्या १२ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सात आणि बाळापूर तालुक्यातील एक अशा आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंच पदांची निवडणूक थेट घेण्यात येत आहे. त्यामध्ये अकोट तालुक्यातील अमोना येथील सरपंच पदाची निवडणूक अविरोध झाली असून, सोमठाणा येथील सरपंच पदासाठी उमेदवारी अर्जच दाखल झाला नसल्याने, अकोट तालुक्यातील पाच आणि बाळापूर तालुक्यातील एक अशा दोन्हा तालुक्यातील सहा सरपंच पदांसह आठ ग्रामपंचायतींच्या ७० सदस्य पदांसाठी रविवार, १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत १८ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी १७ सप्टेंबर रोजी मतदान पथके संबंधित मतदान केंद्रांच्या ठिकाणी रवाना झाली असून, मतदानाची तयारी प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली आहे.
निवडणूक होत असलेल्या आठ ग्रामपंचायती!
जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येत आहे. त्यामध्ये अकोट तालुक्यातील पोपटखेड, धारगड, धारुर रामापूर, अमोना, सोमठाणा, कासोद शिवपूर, गुल्लरघाट इत्यादी सात ग्रामपंचायती आणि बाळापूर तालुक्यातील व्याळा या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. त्यामध्ये अकोट तालुक्यातील अमोना येथील सरपंचांची अविरोध निवड झाली असून, सोमठाणा येथील सरपंच पदासाठी उमेदवारी दाखल नसल्याने या तालुक्यातील पाच आणि बाळापूर तालुक्यातील एक अशा सहा सरपंच पदांसह आठ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसाठी मतदान घेण्यात येत आहे. .