पातूर शहरात सहा दुकाने ‘सील’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:14 AM2021-05-03T04:14:00+5:302021-05-03T04:14:00+5:30
पातूर : तालुक्यासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित करीत कडक निर्बंध घालून ...
पातूर : तालुक्यासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित करीत कडक निर्बंध घालून दिले आहेत. मात्र, शहरात नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरोनासंदर्भात शासनाने घालून दिलेल्या अटी व निर्बंधांचे उल्लंघन करणारी सहा दुकाने सोमवार, दि. २ मे रोजी ‘सील’ करून दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पातूर शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. या परिस्थितीत तालुका प्रशासन शासनाने घालून दिलेल्या अटी व निर्बंधांचे पालन करण्यासाठी व्यावसायिक व नागरिकांना दररोज आवाहन करीत आहे. मात्र, शहरातील मिलन पान पॅलेस, विदर्भ सिमेंट, ओपो डेपो, सचिन कन्फेक्शनरी, केसरीयाजी किराणा, राजधानी बूट हाऊस, दत्तकृपा जेंट्स पार्लर अशा एकूण सहा व्यावसायिक प्रतिष्ठानांविरुद्ध कारवाई करून सील करण्यात आले. तसेच दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही धडक मोहीम यापुढेही सुरू ठेवली जाणार असल्याचे तहसीलदार दीपक बाजड यांनी सांगितले. ही मोहीम तहसीलदार दीपक बाजड, ठाणेदार हरीश गवळी, पातूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सोनाली यादव, ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राहुल उंदरे, प्रभारी मंडल अधिकारी एम. पी. नाईक, तलाठी जामोदकर आदींनी शहरात कडक कारवाई केली.
------------------------------------
तालुक्यात एकूण २६० पॉझिटिव्ह
तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनामार्फत उपाययोजना राबविल्या जातात. मात्र, व्यावसायिक व नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, सोमवारी प्राप्त अहवालानुसार तालुक्यात २५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, सद्यस्थितीत तालुक्याची एकूण रुग्णसंख्या २६०वर पोहोचली आहे.
---------------------------
नागरिक व व्यावसायिकांनी कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
- दीपक बाजड, तहसीलदार, पातूर.