मूर्तिजापूर-बडनेरा दरम्यान सोळा दिवस रेल्वे ब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 02:51 PM2019-07-26T14:51:15+5:302019-07-26T14:51:20+5:30
अकोला : अकोला-बडनेरा दरम्यानच्या ट्रकवर गिट्टी टाकण्याचे काम सुरू असल्याने मूर्तिजापूर ते बडनेरा परिसरात जवळपास सोळा दिवस रेल्वे ब्लॉक घेण्यात येणार आहे
अकोला : अकोला-बडनेरा दरम्यानच्या ट्रकवर गिट्टी टाकण्याचे काम सुरू असल्याने मूर्तिजापूर ते बडनेरा परिसरात जवळपास सोळा दिवस रेल्वे ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे मुंबईकडे धावणाºया सायंकाळच्या सर्व गाड्या प्रभावित होत आहेत.
अकोला ते बडनेरा दरम्यानच्या रेल्वे ट्रकवर गिट्टी टाकणे आणि त्याची व्यवस्थित दबाई पॅकिंग करण्याचे काम गत काही दिवसांपासून सुरू झाले आहे. अकोला ते मूर्तिजापूरपर्यंतचे काम जवळ-जवळ पूर्ण झाले असून, मूर्तिजापूर ते बडनेरापर्यंतचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. यासाठी परिसरात अद्ययावत अशा तीन मशीन कार्यरत आहेत. हे काम आणखी पंधरा दिवस चालणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासन दररोज सायंकाळी मूर्तिजापूर ते बडनेरा दरम्यान ब्लॉक घेत आहे. त्यामुळे नागपूरहून मुंबईकडे धावणाºया सायंकाळच्या सर्व गाड्या एक ते तीन तास उशिराने पोहोचत आहेत. सध्या एकूण सहा गाड्या या ब्लॉकमुळे प्रभावित झाल्या आहेत. रेल्वे ब्लॉकमुळे रेल्वेची गती कमी झाली असली तरी प्रवाशांच्या सुरक्षेसाठीच हा ब्लॉक घेतल्या जात असल्याचे बोलले जात आहे.