रासायनिक खतांसाठी आता मोजावे लागताहेत हेक्टरी सोळाशे रुपये अधिक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:18 AM2021-04-04T04:18:49+5:302021-04-04T04:18:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संतोषकुमार गवई पातूर: रासायनिक खतांच्या किमतीत झालेल्या भरमसाट वाढीने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. तालुक्यात सध्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
संतोषकुमार गवई
पातूर: रासायनिक खतांच्या किमतीत झालेल्या भरमसाट वाढीने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. तालुक्यात सध्या उन्हाळी पिकांची पेरणी जास्त आहे. पिकांना खते देण्याचे काम सुरू असून, आता शेतकऱ्यांना रासायनिक खतासाठी हेक्टरी सोळाशे रुपये अधिक मोजावे लागत आहेत. नवीन रासायनिक खतांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. खरीप हंगाम अवघ्या काही महिन्यावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे.
तालुक्यात उन्हाळी हंगामात भाजीपाला, गहू, हरभरा, भूईमूग, उन्हाळी सोयाबीन, मूग आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पिकांच्या वाढीसाठी संयुक्त खतांची मात्रा दिली जाते. मात्र, आता रासायनिक खताच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. प्रत्येक खताच्या किमती सरासरी दोनशे ते अडीचशे रुपये वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही पिकासाठी हेक्टरी आठ बॅग रासायनिक खताची गरज असते. आता झालेल्या पिकाचा दरवाढीने हेक्टरी १६०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. आधीच शेतकऱ्यांना पेट्रोल, डिझेल दरवाढीसोबतच रासायनिक खतांच्या वाढीचा ही मोठा फटका बसत आहे.
------------------------------------------
शेणखत मिळणे दुरापास्त!
पूर्वी शेतकरी आपल्या शेतात शेणखताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत होते. परंतु, अलीकडे शेणखत मिळणे कठीण झाल्याने सर्वच शेतकरी रासायनिक खत खरेदी करून शेतात टाकतात. पिकाला योग्य अशी खताची मात्रा दिली नाही, तर अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. यामुळे रासायनिक खतांचे दर गगनाला भिडत असतानाही नाईलाजास्तव शेतकऱ्यांना पिकांकरिता ते खरेदी करणे भाग आहे.
----------------------------------------------
शेतकऱ्यांना इंधनाचा दरवाढीचा फटका
डिझेलचे दर दररोज वाढत असल्याने ट्रॅक्टरची मशागत महागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पुन्हा बैलांच्या मदतीने मशागत करावी काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
-----------------------------------------------------------------------------
खतांच्या दरवाढीमुळे लागवडी खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पादन न झाल्यास शेती तोट्याची होणार आहे. शासनाने खतांची दरवाढ त्वरित मागे घ्यावी.
-दीपक इंगळे, शेतकरी, भंडारज बु.
---------------------------------------------------------------------------
मंडळनिहाय पिकांची पेरणी
मंडळाचे नाव भूईमूग मका टरबूज काकडी फुलवर्गीय पिके इतर पिके
पातूर २३१ ३५ ४ ० ६३ १६८
बाभूळगाव ५३१ ९ ० ० ० २
आलेगाव ४१० ८ ६ ० ० ४७
चान्नी ६३१ ३९ १०२ २ ६ १५१
सस्ती २७५ ५१.२ २१ ८.२ ० ४७