राज्यात सहा वैद्यकीय महाविद्यालयांत स्कील सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 06:16 PM2019-03-13T18:16:10+5:302019-03-13T18:16:20+5:30
अकोला : आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या उद्देशाने राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्कील सेंटर उभारण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे घेण्यात आला आहे.
अकोला : आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या उद्देशाने राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्कील सेंटर उभारण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे घेण्यात आला आहे. या अंतर्गत तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर डॉक्टर, परिचारीका, अर्ध वैद्यकीय प्रवर्गातील कौशल्यपूर्ण मनुष्यबळ विकसीत करण्यात येणार आहे. यामध्ये पुणे, सोलापूर नांदेडसह अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागांतर्गत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखाली राज्यातील सहा स्कील सेंटर विकसीत करण्यात येत आहेत. या अंतर्गत स्थलांतर अवस्थेत रुग्णांना आपातकालीन वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर, परिचारीका, अर्ध वैद्यकीय प्रवर्गाला प्रशिक्षण दिले जाणार आहे. परिणामी आपातकालीन स्थितीत रुग्णांना वेळेवर उपचार तर मिळणारच, शिवाय उपचारा अभावी होणारी जीवतहानी देखील नियंत्रणात येण्यास मदत होईल. परंतु, यासाठी लागणारा खर्च संबंधित संस्थेला मिळणाऱ्या निधीतूनच करण्यात येणार आहे. त्यामुळे आहे त्याच निधीतून हे स्कील सेंटर या महाविद्यालयांना चालवावे लागणार आहे. अशा परिस्थितीत हे कितपत यशस्वी ठरेल हा देखील संशोधनाचा विषय आहे.
या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश
ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालय मुंबई, बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, डॉ. वै.स्मृ. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला आणि नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे.