खैर मोहम्मद प्लॉटमध्ये बैलांची कत्तल करताना चौघे गजाआड
By admin | Published: October 12, 2015 01:54 AM2015-10-12T01:54:34+5:302015-10-12T01:54:34+5:30
डाबकी रोड पोलिसांची कारवाई, ५ बैलांना जीवनदान.
अकोला: खैर मोहम्मद प्लॉटमध्ये एका भग्नावस्थेत असलेल्या घरात रविवारी दुपारी बैलांची कत्तल सुरू असताना डाबकी रोड पोलिसांनी छापा मारून चार आरोपींना रंगेहात अटक केली. यामधील एक आरोपी नगरसेवकाचा भाऊ असल्याचे समोर आले असून, पोलिसांना या ठिकाणी एक बैल कापलेल्या स्थितीत आढळला, तर पाच बैलांची कत्तल करण्याची तयारी आरोपींनी चालविली होती. मात्र डाबकी रोड पोलिसांनी वेळीच छापा मारल्यामुळे चार बैलांना जीवनदान मिळाले. शहरातील गंगानगर परिसरातील गोवर्धन प्लॉटमध्ये तब्बल ४६ जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक सुरू अस ताना स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून या जनावरांना जीवनदान दिले. त्यानंतर दुसर्याच दिवशी खैर मोहम्मद प्लॉटमध्ये शेख अनिस शेख मुमजात, शेख मुमताज शेख रसूद, नजीर अहमद अब्दुल बशीर व शेख निसार शेख गफ्फार या चार जणांनी बैलांची कत्तल सुरू केल्याची माहिती डाबकी पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी खैर मोहम्मद प्लॉट येथील घटनास्थळावर छापा मारून पाच बैलांना जीवनदान दिले. मात्र एका बैलाची पूर्णपणे कत्तल झाली होती. त्यामुळे पोलीस त्या बैलाचे प्राण वाचवू शकले नाहीत. डाबकी रोड पोलिसांनी या चारही आरोपींना अटक केली. आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई डाबकी रोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस उ पनिरीक्षक पांडे, महेंद्र बहादूरकर, प्रभाकर मोगरे, राजू वानखडे, गोपाल ठाकूर व भारत इंगळे यांनी केली. शहरात गत एक महिन्यात गोवंशाची कत्तल तसेच वाहतूक करीत असताना पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत २00 च्यावर गोवशांना जीवनदान देण्यात आले आहे. काही आरोपींवर गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र त्यानंतरही गोवंशाची मोठय़ा प्रमाणात कत्तल सुरू असल्याचे शनिवारी व रविवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईमधून स्पष्ट होत आहे. या चारही आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.