गोहत्या बंदी असताना कत्तलखान्याला परवानगी
By admin | Published: July 1, 2015 01:46 AM2015-07-01T01:46:22+5:302015-07-01T02:10:07+5:30
महापालिकेचा प्रताप; जिल्हाधिका-यांच्या तंबीनंतर परवानगी रद्द.
अकोला: संपूर्ण राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना महापालिकेत सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या नाकावर टिच्चून कत्तलखान्याला परवानगी देण्याचा प्रताप आयुक्त सोमनाथ शेटे, प्रभारी उपायुक्त माधुरी मडावी यांनी केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी जिल्हाधिकार्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत उघडकीस आला. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अवघ्या दोन तासात आयुक्त सोमनाथ शेटे यांनी परवानगी रद्द न केल्यास आयुक्तांसह उपायुक्तांविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला. यावर आयुक्त शेटे यांनी परवानगी रद्दचे आदेश जारी केले. राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार येताच गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला. अकोला मनपातही भाजप-सेना युतीचीच सत्ता असताना, आयुक्त सोमनाथ शेटे यांनी अकोटफैल भागात कत्तलखाना सुरू करण्यासाठी १७ जून रोजी परवानगी दिली. हा प्रकार मंगळवारी जिल्हाधिकार्यांच्या दालनात आयोजित प्राणी प्रतिबंधक क्लेष समितीमध्ये उघड झाला. अकोटफैलमधील कत्तलखान्याच्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकार्याची नियुक्ती करण्यासंदर्भात आयुक्तांनी पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्तांना पत्रव्यवहार केल्याने हा गंभीर प्रकार जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या लक्षात आला. अवघ्या दोन तासात ही परवानगी रद्द न केल्यास आयुक्तांसह उपायुक्त माधुरी मडावी यांच्याविरोधात फौजदारी तक्रारीचा इशारा जिल्हाधिकार्यांनी दिला. यावर आयुक्तांनी कत्तलखान्याची परवानगी रद्द करण्याचे आदेश जारी केले.