वान, बारूखेडा, झरी परिसरात सागवान झाडांची कत्तल
By Admin | Published: December 6, 2014 12:02 AM2014-12-06T00:02:37+5:302014-12-06T00:02:37+5:30
पद्धतशीर लावली जाते विल्हेवाट: वनविभागाचे दुर्लक्ष.
तेल्हारा (अकोला) : वनविभागाच्या हद्दीतील वान, बारूखोडा, झरी परिसरात अवैध वृक्षतोडीला ऊत आला आहे. दररोज हजारो सागवान झाडांची कत्तल होत असल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे.
आदिवासी भागातील जनता सुरुवातीला आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी सातपुड्यातील जंगलात अवैध वृक्षतोड करीत होती. परंतु, त्यांनी याकडे पाठ फिरवली आहे. आता या व्यवसायातून होणार्या कमाईवर डोळा ठेवून विशिष्ट समूहाच्या व्यापार्यांनी मजुरांकडून वृक्ष तोड सुरू केली आहे. बारुखेडा, वान परिसरात भरदिवसा ३0 ते ४0 मजूर सागवान झाडांची पहिल्या दिवशी कटाई करून दुसर्या दिवशी सागवान लाकडाची पद्धतशीरपणे विल्हेवाट लावली जाते. विशेष म्हणजे, सागवान घेऊन जाणारी वाहने झरी गेटमधून पास होतात कशी, वनविभागाचे कर्मचारी असताना खासगी वाहने व सुमारे ४0 सायकली कोणाच्या आदेशाने सोडली जातात, हे प्रश्न अनुत्तरित राहतात. राज्य व केंद्र शासन वृक्षलागवड करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. दुसरीकडे सर्रास होत असलेल्या वृक्षतोडीकडे वनविभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वनप्रेमींकडून होत आहे. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे परिसरातील वृक्षमित्र संघटनांचे लक्ष लागले आहे.