रस्ता रुंदीकरणासाठी होणार हजारो वृक्षांची कत्तल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 02:50 PM2019-05-11T14:50:08+5:302019-05-11T14:50:29+5:30
मूर्तिजापूर : अंजनगाव-दर्यापूर-मूर्तिजापूर राज्य महामार्ग क्रमांक २८२ रुंदीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली हिरवीगार महाकाय निंबाच्या हजारो झाडांची कत्तल करण्यात येणार आहे.
- संजय उमक
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : अंजनगाव-दर्यापूर-मूर्तिजापूर राज्य महामार्ग क्रमांक २८२ रुंदीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली हिरवीगार महाकाय निंबाच्या हजारो झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वन विभागाला एक प्रस्तावही पाठविला आहे. जेवढी वृक्ष तोडण्यात येणार आहेत, त्यापेक्षा जास्त झाडे लावण्याची मागणी होत आहे.
एकीकडे शासन ‘झाडे लावा-झाडे जगवा’, हा कानमंत्र देऊन वृक्ष लागवडीवर प्रचंड पैसा खर्ची घालत आहे. दुसरीकडे शासनाकडूनच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होताना दिसते. अंजनगाव-दर्यापूर-मूर्तिजापूर या ५२ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या कामाने गती घेतली आहे. रस्त्याचे सात मीटरपर्यंत रुंदीकरण करण्यात येणार आहे. या रुंदीकरणादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व दीड ते दोनशे वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या निंबाच्या हजारो महाकाय वृक्षांची कत्तल होणार आहे.
आयुर्वेदात अत्यंत उपयोगाचे व महत्त्वाचे भारतात सर्वत्र आढळणारे कडूनिंबाचे झाड निंब व नीम या नावांनी ओळखले जाते. पुरातन काळापासून आयुर्वेद औषधांमध्ये याचा उपयोग होत आला आहे. मेलिएसी (म्हणजे निंब) कुलातील हा वृक्ष असून, त्याचे शास्त्रीय नाव अॅझॅडिराक्टा इंडिका असे आहे. द. भारत, कर्नाटक, श्रीलंका, मलेशिया व ब्रह्मदेश या प्रदेशात म्यानमार हा वृक्ष आढळतो. अशा वृक्षतोडीने आता आयुर्वेदात मानाचे स्थान असलेल्या निंबाच्या झाडांवर कुºहाड चालणार आहे.
२०१७-१८ च्या अर्थसंकल्प कार्यक्रमांतर्गत, १३१ कोटी रुपये खर्चून अंजनगाव-दर्यापूर ३२ किलोमीटर, दर्यापूर-मूर्तिजापूर २० किलोमीटर अशा ५२ किलोमीटर बांधण्यात येणाऱ्या या रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली हजारो झाडे मुळापासूच उपटून काढावी लागणार आहेत.
यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन्ही बाजूंनी उभी असलेली हजारो झाडे कापण्यासाठी वन विभागाकडे तशी रीतसर परवानगीसुद्धा मागितली आहे. या वृक्षतोडीने प्रवाशांना अथवा वाटसरूंना विसाव्यासाठी एकही झाड शिल्लक राहणार नसल्याने वृक्षप्रेमी वर्गात कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. रस्ता रुंदीकरणासाठी हजारो झाडांची कत्तल होत असल्याने तोडलेल्या झाडांच्या पाचपट झाडांची लागवड संबंधितांनी करावी व त्याचे संगोपन करून ती मोठी करावी, अशी मागणीही याप्रसंगी होत आहे.
झाडे तोडणे हे पर्यावरणाच्या हिताचे नाही; परंतु २८२ हा राज्य महामार्ग रुंदीकरणाचे काम शासनाने हाती घेतले आहे. यासाठी दुतर्फा असलेली निंबाची आणि बाभळीची झाडे तोडल्याशिवाय पर्याय राहिला नाही. तसा प्रस्ताव पाठविला आहे. मोबदल्यात आम्ही त्यापेक्षा जास्त झाडे लावणार आहोत.
- अनिल जवंजाळ, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, दर्यापूर, अमरावती.