रस्त्यावरील वृक्षांची कत्तल!
By admin | Published: April 17, 2017 07:49 PM2017-04-17T19:49:53+5:302017-04-17T19:49:53+5:30
मूर्तिजापूर- मोठमोठ्या झाडांची राजरोसपणे कत्तल करून झाडे नेस्तनाबूद केल्या जात असल्याचा प्रकार १७ एप्रिल रोजी मूर्तिजापूर-कारंजा रोडवर हातगाव शिवारात पाहावयास मिळाला.
पर्यावरणाचे नुकसान : सा.बां.विभागाचे दुर्लक्ष
मूर्तिजापूर : शासन एकीकडे झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करीत आहे तर दुसरीकडे मोठमोठ्या झाडांची राजरोसपणे कत्तल करून झाडे नेस्तनाबूद केल्या जात असल्याचा प्रकार १७ एप्रिल रोजी मूर्तिजापूर-कारंजा रोडवर हातगाव शिवारात पाहावयास मिळाला.
मूर्तिजापूर-कारंजा रोडवरील हातगाव शिवारात येणाऱ्या आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिनस्थ येणाऱ्या मार्गावर अनेक मोठ-मोठी निंबाची वृक्ष आहेत. कोण्यातरी अज्ञात इसमाने झाडे तोडून त्याची अवैधरीत्या कत्तल करण्याच्या दृष्टिकोनातून शेताच्या धुऱ्यावर आग लावून झाडांच्या बुंद्यालाही आग लावून दिल्याने हिरवेगार निंबाचे झाड पेटून जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावून त्यांना लहानाचे मोठे केले. सध्याच्या घडीला त्याच झाडांची अवैधपणे कत्तल केल्या जात असल्यामुळे दिवसाकाठी झाडांची संख्या कमी होत आहे; मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन राजरोसपणे झाडांची होत असलेली अवैध कत्तल थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मूर्तिजापूर-दर्यापूर रोडवर सिरसो गावासमोरही असाच प्रकार पहावयास मिळाला आहे. त्याठिकाणीदेखील निंबाच्या झाडांच्या बुंद्याला आग लावली होती. अशाप्रकारे त्या रस्त्यावरील झाडे पाडून लंपास केली जात असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. राजरोसपणे झाडांची अवैधपणे कत्तल करणाऱ्याविरुद्ध संबंधित विभागाने कार्यवाही करण्याची मागणी जोर धरत आहे. (तालुका प्रतिनिधी)