‘एसडीओं’च्या निवासस्थानी वृक्षांची कत्तल!

By admin | Published: July 13, 2017 01:20 AM2017-07-13T01:20:32+5:302017-07-13T01:20:32+5:30

चार कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पाला हरताळ

Slaughter of trees at the residence of 'SDO'! | ‘एसडीओं’च्या निवासस्थानी वृक्षांची कत्तल!

‘एसडीओं’च्या निवासस्थानी वृक्षांची कत्तल!

Next

विजय शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पपुर्तीदरम्यान अकोट येथील महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) उदय राजपूत यांच्या शासकीय निवासस्थान परिसरातील हिरव्या वृक्षांची कत्तल करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने १२ जुलै रोजी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये उघडकीस आली आहे. या गंभीर प्रकारामुळे चार कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पाला खुद्द शासकीय अधिकारीच हरताळ फासत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शासनाशी दुटप्पी धोरण ठेवणाऱ्या या प्रकारामुळे जनतेत व निसर्गप्रेमीत चुकीचा संदेश जात असून, शासनाने या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सिंधी कॅम्प परिसरात महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांचे निवासस्थान आहे. या परिसरात विविध जातीचे लहान-मोठे हिरवेगार वृक्ष आहेत. त्यापैकी आठ ते दहा वृक्षांची कटाई नुकतीच केली असल्याचे या स्टिंगमध्ये दिसून आले आहे. काही झाडे बुंध्यापासून कापण्यात आली, तर काही मोठ्या झाडांची कटाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वाळलेले निंबाचे मोठे झाड मात्र कापण्यात आले नाही. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, या निवासस्थान परिसरातील निंबाची तीन झाडे वाळलेली असल्याचे दाखवित सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सरनायक यांनी १ जुलै रोजी (चार कोटी वृक्ष लागवड सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी) त्या निंबाच्या झाडांचा विमाश्रगृहावर लिलाव केला होता.
त्यानंतर लिलाव घेतलेल्या लोकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थान परिसरातील निंबाची दोन मोठी झाडे बुंध्यासह कापली, तर एक वाळलेले झाड न कापता इतर सहा झाडांची कटाई करून लाकडे लंपास केली. खरे तर या परिसरात केवळ एकच निंबाचे वाळलेले झाड होते; ते पुरावा म्हणून कायम ठेवून उर्वरित हिरव्या झाडांची कटाई करण्यात आली. खुद्द उपविभागीय अधिकारी राहत असलेल्या कुलूपबंद घरामधील एका झाडाचा कटाईमध्ये समावेश आहे. त्यामुळे महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व वृक्षांची कत्तल करणाऱ्या मंडळीच्या संगनमताने हा गंभीर प्रकार जाणीवपूर्वक घडला असल्याचे सिद्ध होत आहे. विशेष म्हणजे या हिरव्या झाडांची कटाई केल्यानंतर परिसरातून लाकडे रफादफा करण्यात आली, तर काही झाडांच्या बुंध्यावर माती टाकण्यात आल्याचे आढळून आले आहे.
राज्यातील वनाच्छादनाचे प्रमाण सध्या १६ टक्के इतके आहे. वस्तुत: ३३ टक्के वृक्षाच्छादनाचे राष्ट्रीय उद्दिष्ट गाठण्यासाठी जवळपास ४०० कोटी वृक्ष लावावे लागतील. ३३ टक्के वृक्षाच्छादनाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सुरुवात म्हणून २०१६ मध्ये १ जुलै रोजी २ कोटी ८३ लाख वृक्ष राज्यभरात लावण्यात आले. यावर्षी चार कोटी वृक्ष लागवड करण्याचे लक्ष्य होते; परंतु शासनाचे विविध विभाग एकीकडे वृक्ष लागवडीची उद्दिष्टपूर्ती करीत असताना दुसरीकडे वृक्षाची कत्तल करणारे ठरत असल्याने शासनाच्या संकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
या वृक्षतोडीबाबत अकोटचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला; परंतु त्यांनी फोन न उचलल्यामुळे या वृक्षतोडीबाबत त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.

पडताळणीशिवाय झाडांचा लिलाव!
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सरनायक यांनी वृक्षांच्या लिलावाची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अकोला, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम अभियंता भुबरे यांना देण्यात आली; परंतु कोणीही या लिलावातील झाडांची पडताळणी केली नसल्याचे घडलेल्या प्रकारावरून स्पष्ट होत आहे. शिवाय, तीन झाडांचा लिलाव असताना वाळलेले एक झाड सोडून हिरव्या वृक्षांची लाकडे तोडल्याने यामध्ये भ्रष्ट आर्थिक व्यवहाराची शक्यता सकृतदर्शनी निर्दशनात येत आहे. शासनाचा चार कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प सप्ताह सुरू असताना झाडाचा लिलाव करणे योग्य राहणार नाही, याकडेसुद्धा कोणीच लक्ष दिले नाही. त्यामुळे वृक्षांबाबत कोणालाच सोयरसुतक नसल्याची बाब समोर येत आहे.

सध्या मी सुटीवर आहे. प्रत्यक्ष पाहणी केल्यावरच काय प्रकार घडला, ते सांगता येईल.
- सुरेश भुबरे,
शाखा अभियंता, सा.बां. विभाग, अकोट.

Web Title: Slaughter of trees at the residence of 'SDO'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.