रात्रीचे जागरण आरोग्यास घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 01:50 PM2019-02-01T13:50:39+5:302019-02-01T13:50:58+5:30
अकोला : बदलत्या जीवनशैलीमुळे अवेळी जेवण अन् रात्री उशिरापर्यंत जागरणाचे प्रमाण वाढले आहे. हा प्रकार आरोग्यास घातक असून, त्यामुळे कर्करोगासोबतच मधुमेह, ह्रदय विकारासारख्या आजारांचा धोका वाढला आहे
अकोला : बदलत्या जीवनशैलीमुळे अवेळी जेवण अन् रात्री उशिरापर्यंत जागरणाचे प्रमाण वाढले आहे. हा प्रकार आरोग्यास घातक असून, त्यामुळे कर्करोगासोबतच मधुमेह, ह्रदय विकारासारख्या आजारांचा धोका वाढला आहे. वयाच्या तिशीनंतर हा धोका सर्वाधिक असल्याने वेळीच जीवनशैली बदलण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
एका अभ्यासानुसार, रात्री झोप नीट न मिळाल्याने किंवा रात्रभर जागरण झाल्याने मनुष्याच्या डीएनएचा आकार बदलत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मानवी डीएनएच्या रचनेत बदल झाल्यास कर्करोगासह मधुमेह व इतर गंभीर आजाराची शक्यता वाढते. बदलत्या जीवनशैलीचा हा सर्वाधिक घातक परिणाम आहे. चुकीच्या जीवनशैलीचा सर्वात जास्त धोका वयाच्या तिशीनंतर आहे. या बदलांमुळेच कमी वयात कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. यावर वेळीच नियंत्रण न आणल्यास हा प्रकार किती धोकादायक आहे आणि रात्रीची झोप किती महत्त्वाची आहे, हे या संशोधनामुळे स्पष्ट झाले.
या आजारांचा धोका
- कर्करोग
- मधुमेह
- हृदयाचे विकार
- मज्जातंतूचे विकार
- श्वासनलिकेसंदर्भात विकार
नेटकऱ्यांसाठी धोक्याची घंटा
बहुतांश तरुणाई रात्री उशिरापर्यंत मोबाइलवर व्यस्त असते. रात्री उशिरापर्यंत नेट सर्फिंगमुळे होणारे जागरण आणि अवेळी जेवण हा प्रकार नेटकºयांसाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे वेळीच चुकीच्या सवयी बदलून निरोगी आयुष्य जगण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
निरोगी आरोग्यासाठी हे करा!
- किमान सात ते आठ तास झोप घ्या.
- रात्री १२ च्या आत जेवण करा.
- रात्रीचे जेवण हलके व पचणार असेच घ्या.
- पौष्टिक आहार घ्या.
- भरपूर पाणी प्या.
- मॉर्निंग वॉकची सवय लावा.
- नियमित व्यायाम करा.
- चुकीच्या सवयी बदला.
रात्रीचे जागरण हे आरोग्यासाठी घातकच आहे. झोप न घेणे म्हणजे विविध आजारांना निमंत्रण देणे आहे. हा धोका टाळण्यासाठी चुकीच्या सवयी बदला. रात्री बाराच्या आधी जेवण आणि झोपणे आवश्यक आहे. जेणे करून किमान सात ते आठ तासांची झोप होईल.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला.