भावना गवळी यांच्या विरोधातील घोषणाबाजी: रेल्वे पाेलिसांनी नाेंदविले जबाब
By राजेश शेगोकार | Published: December 4, 2022 05:38 PM2022-12-04T17:38:56+5:302022-12-04T17:41:33+5:30
अकोला लोहमार्ग पोलिसांकडे केली होती तक्रार दाखल
राजेश शेगाेकार, अकोला: मुख्यमंत्री शिंदे यांचे समर्थन करून त्यांच्या गटात दाखल झालेल्या वाशीमच्या खासदार भावना गवळी २२ नाेव्हेंबर राेजी मुुंबईकडे जाण्यासाठी अकोला रेल्वे स्थानकात आल्या असताना त्यांच्या विराेधात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी गद्दार गद्दार अशी नारेबाजी केली हाेती. या प्रकरणात रेल्वे पाेलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने रविवारी रेल्वे पाेलिसांनी काही पदाधिकाऱ्यांचे जबाब नाेंदविले.
खासदार गवळी यांनी नारेबाजीविराेधात अकोला लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून त्यामध्ये खासदार विनायक राऊत, आमदार नितीन देखमुख यांनी चिथावणी दिल्याचे नमूद केले आहे. या तक्रारीनंतर खासदार विनायक राऊत, आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यासह इतर शिवसैनिकांच्या विरोधात भादंवि १४३, २९४, ५००, ५०९, ५०४, ५०६ या विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. यातील पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावून रविवारी बयाण नोंदविण्यासाठी बोलावले होते. जवळपास दोन ते तीन तास चाललेल्या या चौकशीमध्ये जीआरपी पोलिस निरीक्षक अर्चना गाढवे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी जिल्हाप्रमुख गोपाल दातकर दिलीप बोचे, पूर्व शहरप्रमुख अतुल पवणीकर, गजानन बोराळे, राहुल कराळे, राम गावंडे, प्रदीप गुरुगुद्दे व पदाधिकाऱ्यांचे बयाण नोंदविले.