लघु व्यावसायिक, फेरीवाल्यांकडून मनपाच्या हातावर तुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:49 PM2019-04-13T12:49:46+5:302019-04-13T12:50:09+5:30
अकोला: मुख्य रस्त्यांवरील लघू व्यावसायिक व फेरीवाल्यांना गणेश घाटावर पर्यायी जागा देण्याचा महापालिकेचा प्रयोग सपशेल फसला.
अकोला: मुख्य रस्त्यांवरील लघू व्यावसायिक व फेरीवाल्यांना गणेश घाटावर पर्यायी जागा देण्याचा महापालिकेचा प्रयोग सपशेल फसला. लघू व्यावसायिक व फेरीवाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला चर्चेत झुलवत ठेवून प्रशासनाच्या हातावर तुरी टेकवल्याचे चित्र समोर आले आहे. गणेश घाटावर दुकान थाटण्यास फेरीवाल्यांनी पाठ फिरवली असून, पुन्हा एकदा मुख्य रस्त्यांवरच ठिय्या मांडला आहे. याप्रकरणी मनपा आयुक्त संजय कापडणीस काय निर्णय घेतात, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठ व परिसराला लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांनी गराडा घातला आहे. मनपाच्या अतिक्र मण निर्मूलन पथकाचा धाक नसल्यामुळे फेरीवाले चक्क मुख्य रस्त्यांवर बाजार मांडत असल्याचे चित्र आहे. यामध्ये प्रामुख्याने रेडीमेड ड्रेस विक्रेते, खाद्यपदार्थांची विक्री करणारे तसेच फळ विके्रत्यांचा समावेश आहे. शहराची संपूर्ण बाजारपेठ गांधी रोड, टिळक रोड, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉजपर्यंतच्या मार्गावर स्थिरावली आहे. अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्यावर धड पायी चालणे मुश्कील झाले आहे. या समस्येवर प्रभावी तोडगा काढण्याच्या उद्देशातून महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी फेरीवाले व लघू व्यावसायिकांना मोर्णा नदीच्या काठावरील मुख्य गणेश घाटावर पर्यायी जागा देण्याचा निर्णय घेतला. अतिक्रमकांची नेमकी संख्या निश्चित करण्यात आली. तसेच लघू व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाºयांसोबत वारंवार सकारात्मक चर्चा केली. संघटनेच्या पदाधिकाºयांनीसुद्धा गणेश घाटावर जाणार असल्याचा विश्वास दर्शविला. सहा दिवस उलटून गेल्यानंतरही एकाही फेरीवाल्याने गणेश घाटावर दुकान थाटले नसल्याचे चित्र समोर आले आहे.
या ठिकाणी बाराही महिने अतिक्रमण
शहरातील मुख्य रस्त्यांवर थाटल्या जाणाºया अतिक्रमणामुळे सर्वसामान्य अकोलेकर त्रस्त आहेत. यामध्ये प्रामुख्याने गांधी चौक, गांधी रोड चौपाटी, मनपाची आवारभिंत, जैन मंदिर परिसर, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉज परिसर, मोहम्मद अली मार्ग, ताजनापेठ चौक, टॉवर चौक , धिंग्रा चौकाचा समावेश आहे.
नियोजनाची केली ऐशीतैशी
शासनाने मनपाच्या स्तरावर फेरीवाल्यांची संख्या निश्चित करण्यासाठी मोबाइल अॅप विकसित केले. सदर अॅपच्या माध्यमातून फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. मनपाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानच्या माध्यमातून ठाणे येथील एजन्सीने सर्वेक्षण केले असता शहरातील फेरीवाल्यांची संख्या १,६०० पेक्षा अधिक होणार असल्याची माहिती आहे. नोंदणीकृत फेरीवाल्यांना झोननिहाय जागांचे वाटप करण्यासाठी मनपाने नियोजन केले होते. या नियोजनाची फेरीवाले व लघू व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऐशीतैशी केल्याचे समोर आले.
रेडीमेड ड्रेस विक्रेता, कटलरी व खाद्यपदार्थांची विक्री करणाºयांना एकाच ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात संबंधित संघटनांच्या पदाधिकाºयांसोबत सातत्याने चर्चा केली. यापुढे अतिक्रमकांनी रस्त्यावर बाजार मांडल्यास कोणतीही हयगय न करता साहित्य जप्त करण्याचे निर्देश अतिक्रमण विभागाला दिले आहेत.
- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा