बाल कावडधारी शिवभक्ताच्या पालख्या भाविकांचे आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2023 12:16 PM2023-09-11T12:16:09+5:302023-09-11T12:16:47+5:30
कावड मार्गावर शिवभक्ताचे स्वागत करण्यासाठी भाविकांची अलाेट गर्दी
- राजरत्न सिरसाट
अकोला: अकाेल्याचे अराध्य दैवत श्री राज राजेश्वरला जलाभिषेक करण्यासाठी पूर्णा नदीचे पवित्र जल कावडमध्ये घेऊन हजाराे शिवभक्त शहरात दाखल झाले असून, जय भाेलेचा गजर करीत, ढाेल ताशाच्या निनादात एक एक पाऊस पुढे सरकत आहेत़ गांधीग्राम ते अकाेला कावड मार्गाच्या दुतर्फा कावडधारी शिवभक्ताच्या स्वागतासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे.यावर्षी बाल शिवभक्तांच्या पालख्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
अकाेल्यातील मानाची श्री राजराजेश्वर पालखी, अन्य पालख्यासह बाल शिवभक्त कावडधारक शहरात पाेहाेचले आहेत.यावर्षी अधिककृत १४० कावड पालख्यांची नाेंदणी झाली असली तरी इतर छाेट्या पालख्यांचाही यात समावेश अहे. अशाेक नगर (अकाेट फाईल) येथे विधवत पूजन झाल्यानंतर या पालख्या श्री राज राजेश्वराच्या मंदिराकडे मार्गक्रमण करीत आहेत. पालखी मार्गावर दाेन्ही बाजुने राजकीय, सामाजिक संघटनांनी पेंडाल,व्यासपीठ उभारून जलपान,अल्पाेपहार व महाप्रसादाची व्यवस्था केली आहे.
मुख्य पालखी पाेहाेचेल २ वाजतापर्यंत
मुख्य पालख्या एक एक पाऊल पुढे सरकत असून, दुपारी २ वाजतानंतर जलाभिषेक करण्यासाठी श्री.राज राजेश्वर मंदिरात पाेहाेचण्याची शक्यता आहे.
कावड पालखी मार्गावर कडक पाेलिस बंदाेबस्त, ड्रोनच्या घिरट्या, सीसी कॅमेऱ्यांची नजर
राजराजेश्वराच्या कावड-पालखी मार्गावर दोन हजारांवर पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले असून, ड्रोन, सीसी कॅमेरे, श्वान पथक तैनात करण्यात आले आहे. २५० पेक्षा अधिक कर्मचारी इतर जिल्ह्यातून बंदोबस्तासाठी बोलाविण्यात आले आहेत. राज्य राखीव दलाचे एक युनिट व ८०० होमगार्डही बंदोबस्तात आहेत. मद्यप्राशन किंवा इतर नशा करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांचे एक खास पथक तैनात आहे.