छोटीशी चूकही ठेवू शकते वैद्यकीय प्रवेशापासून वंचित - डॉ. प्रविण शिंगारे
By atul.jaiswal | Published: June 2, 2018 03:19 PM2018-06-02T15:19:13+5:302018-06-02T15:19:13+5:30
अकोला : वैद्यकीय प्रवेश प्रक्रीया अत्यंत पारदर्शक पध्दतीने राबविली जात असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा. छोटीशी चूकसुध्दा विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवू शकते, अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रविण शिंगारे यांनी वैद्यकीय प्रवेश परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अकोला : वैद्यकीय प्रवेश प्रक्रीया अत्यंत पारदर्शक पध्दतीने राबविली जात असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा. छोटीशी चूकसुध्दा विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवू शकते, अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रविण शिंगारे यांनी वैद्यकीय प्रवेश परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शनिवारी येथे केले.एनईईटी (निट)परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांकरीता व एमबीबीएस,बीडीएस, ओटी, पीटीसाठी प्रवेश प्रक्रियेसंबंधी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यावतीने शनिवारी येथील प्रमिलाताई ओक सभागृहात विशेष मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रविण शिंगारे यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, डॉ. अपर्णा पाटील, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय , शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण , डॉ. राजेश कार्यकर्ते, माजी महापौर उज्वला देशमुख, माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे, माजी नगराध्यक्ष हरिश अलिमचंदाणी, डॉ. अशोक ओळंबे, गोपी ठाकरे,आशिष पवित्रकार उपस्थित होते.
डॉ. शिंगारे यांनी यावेळी वैद्यकीय प्रवेशाचा इतिहास उलगडताना एनईईटी परिक्षा संदर्भात स्पष्टीकरण दिले. देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर ही परिक्षा घेण्यात येते. या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाकरीता राष्ट्रीय पातळीवर १५ टक्के तर राज्यासाठी ८५ टक्के जागा असतात, असे शिंगारे यांनी सांगितले. सदर परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी जागरुकपणे फॉर्म भरावा. अत्यंत पारदर्शक पध्दतीने प्रवेश प्रक्रीया राबविली जात असल्याने विद्यार्थ्यांनी फॉर्म काळजीपूर्वक भरावा. छोटीशी चूकसुध्दा प्रवेशापासून वंचित ठेवू शकते. महाविद्यालयाची निवड करीत असताना त्या महाविद्यालयाचा कोड व्यवस्थित भरा. आरक्षण, किती जागा आहेत, शुल्क किती याची माहिती घ्या. फॉर्म व्यवस्थित वाचून तो भरल्यानंतर इतरांना दाखवा, त्यातील चुकांची दुरुस्ती करुनच फॉर्म सबमिट करावा, असेही शिंगारे यांनी सांगितले. यानंतर पालक व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात पालकमंत्री यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना दोन मिनीट शांतता ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला शहरातील डॉक्टर्स, पालक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. अमरावती विभागातील पाचही जिल्हयातील पालक व विद्यार्थी या शिबीराला उपस्थित होते.
डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक - डॉ. रणजीत पाटील
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी या मार्गदर्शन शिबीराचे महत्त्व विषद करताना सांगितले की, आपला पाल्य डॉक्टर व्हावा, हे अनेक पालकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते. त्यासाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. एनईईटी परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय करावे, यासाठी हे शिबीर आवश्यक आहे. या शिबीराचा निश्चितच पालकांना व विद्यार्थ्यांना फायदा होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.