फटाक्यांचा धूर अन् रस्त्यावरील धूळ फुफ्फुसासाठी घातक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 10:20 AM2020-11-13T10:20:53+5:302020-11-13T10:21:01+5:30
रस्त्यावरील धूळ आणि फटाक्यांचा धूर फुफ्फुसासाठी घातक ठरू शकतो.
अकोला: सध्या थंडीचा जोर वाढत असून, रस्त्यावरील धूळ आणि फटाक्यांचा धूर फुफ्फुसासाठी घातक ठरू शकतो. विशेषत: दमा आणि कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांसाठी हे वातावरण घातक ठरू शकते. अशा परिस्थितीत नागरिकांनी रस्त्यावरील धुळीसोबतच फटाक्यांच्या धुरापासूनही स्वत:चे संरक्षण करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देतात. हिवाळा सुरू होताच दमा व श्वसन संस्थेशी निगडित विविध समस्या उद्भवतात. अशातच शहरातील मुख्य रस्ते निर्मितीचे काम सुरू असल्याने सर्वत्र धूळ पसरली आहे. हवेतील आर्द्रतेमुळे धुळीचे कण हवेत राहत असल्याने ते थेट श्वसनाद्वारे शरीरात प्रवेश करतात. त्याचा श्वसन नलिकेतील म्युकस लेअरला फटका बसतो. यासोबतच दिवाळीला फटाक्यांचा धूर आणि त्यासोबत श्वसननलिकेत जाणाऱ्या बारूदचे कण हेदेखील तेवढेच घातक ठरतात. अस्थमाच्या रुग्णांना या गोष्टींचा जास्त त्रास होतो. शिवाय, आता कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनाही त्याचा त्रास संभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या दिवसांत नागरिकांनी निरोगी फुफ्फुस ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या, असे आवाहन तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
या समस्या उद्भवतात
- ॲलर्जीमुळे श्वसननलिकेवर सृजन
- खोकला, दम लागणे
- झोप न लागणे
- ही काळजी घ्यावी
- कमी धुराचे फटाके फोडावे
- तोंडाला रुमाल बांधावा
- मोकळ्या परिसरात फटाके फोडावे
- वयस्क व्यक्तिंनी विशेष काळजी घ्यावी
- रेस्क्यू मेडिकेशन (अस्थमा पंप) सोबत ठेवावा.
- दम्याचे औषध नेहमी घ्यावे
‘फायब्रोसीस’च्या रुग्णांनी धूळ व धुरापासून दूर राहा
कोरोना होऊन गेला; पण लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना धूळ आणि धुराचा जास्त धोका नाही; मात्र ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव फुफ्फुसांवर झाला आहे, अशा फायब्रोसीसच्या रुग्णांसाठी धूळ व फटाक्यांचा धूर घातक ठरू शकतो. त्यामुळे या रुग्णांनी हिवाळ्यात रस्त्यावरील धूळ आणि फटाक्यांच्या धूरापासून दूर राहणे आवश्यक आहे.
हिवाळ्यात दमाच्या रुग्णांसाठी स्मॉग घातक असतो. सोबत फटाक्यांचाही धूर फुफ्फुसासाठी धोकादायक ठरू शकतो. अशा परिस्थितीत नागरिकांनी विशेषत: दमा आणि नुकत्याच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
- डॉ. सागर थोटे, छाती, हृदय व फुफ्फुस रोग तज्ज्ञ, अकोला.