गांजा तस्करी; महिलेसह दोन आरोपींना १0 वर्षांंची शिक्षा
By admin | Published: May 11, 2016 02:31 AM2016-05-11T02:31:15+5:302016-05-11T02:31:15+5:30
हिवरखेड पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरूद्ध दाखल होता गुन्हा.
आकोट: गांजा तस्करीप्रकरणी सत्र न्यायालयाने दोन आरोपींना मंगळवारी १0 वर्षांंची शिक्षा सुनावली. ऑटोरिक्षाचालक रोहन महादेव घुगंड (रा. हिवरखेड) व रेणुका शेषराव चव्हाण (रा. बोरवा ता. तेल्हारा) ही शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना १४ नोव्हेंबर रोजी बेलखेड ते गोर्दा रोडवर घडली होती.
गांजा जप्तप्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात एनडीपीएसच्या कायद्याचे कलम ८, २0, २२ अन्वये एकूण पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांची कसून विचारपूस केली. तपासानंतर पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. याप्रकरणी आकोट येथील सत्र न्यायालयात अनिल सुब्रमण्यम यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपी रोहन घुगंड व रेणुका चव्हाण यांना प्रत्येकी १0 वर्षे कारावासाची शिक्षा व प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्षाची शिक्षा भोगावी लागणार आहे. या प्रकरणात सरकारतर्फे सहायक सरकारी अधिवक्ता प्रवीण चिंचोले यांनी बाजू मांडली. आरोपींकडून अँड. किशोर देशपांडे व अँड. खुश्रीद अली, अँड. एम. बी. शर्मा, अँड. श्रीकांत तायडे, अँड. लियाकत अली यांनी युक्तिवाद केला.