देशी कट्ट्यांच्या तस्करीचा माेठा गाेरखधंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:18 AM2020-12-29T04:18:09+5:302020-12-29T04:18:09+5:30
सचिन राऊत, अकाेला : शहरासह जिल्ह्यात देशी कट्टे तसेच पिस्तूलची गुन्हेगार माेठ्या प्रमाणात आयात करीत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून ...
सचिन राऊत, अकाेला : शहरासह जिल्ह्यात देशी कट्टे तसेच पिस्तूलची गुन्हेगार माेठ्या प्रमाणात आयात करीत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समाेर आली आहे. मध्य प्रदेशातील ब-हाणपूर तसेच बुलडाणा जिल्ह्यातील टुनकी बावनगीर सीमेवरून या देशी कट्टे तसेच पिस्तूलची तस्करी करण्यात येत असून तीन हजारांपासून याची सुरुवात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
जिल्हाभरात २०२० या वर्षात तीन गाेळीबाराच्या घटना घडलेल्या आहेत. तर, यापूर्वी गाेळ्या झाडून हत्या केल्याच्या माेठ्या घटना अकाेल्यात घडल्या असून यावेळी वापरण्यात आलेले पिस्तूल, देशी कट्टा हे अवैधरीत्या वापरल्याचेही पाेलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अकाेला जिल्ह्यात देशी कट्ट्यासह पिस्तूल व काडतुसांची माेठ्या प्रमाणात तस्करी करण्यात येत असल्याचेही वृत्त आहे. शहरातील काही माेजक्या पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत देशी कट्टे व पिस्तूलची तस्करी करण्यात येत आहे. पाेलिसांकडूनही या तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, तरीही हा गाेरखधंदा सुरूच असल्याचे गाेपाल अग्रवाल यांच्या हत्याकांडावरून समाेर आले आहे. देशी कट्टा व पिस्तूल अत्यंत कमी किमतीमध्ये मिळत असल्याने गुन्हेगारी वृत्ती असलेल्यांचेही चांगलेच फावत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे देशी कट्टा व पिस्तूल तस्करीच्या मुख्य सूत्रधारांच्या पाेलिसांनी मुसक्या आवळण्याची आता गरज आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर काही प्रमाणात नियंत्रण येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
५०० रुपयांना एक काडतूस
देशी कट्टा व पिस्तूलसाठी लागणारे काडतूस ५०० रुपयांना एक मिळत असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. यासाठी आंतरराज्यीय टाेळ्याच सक्रिय असल्याचेही वास्तव असून खासगी बसमध्येही या शस्त्रांची तस्करी हाेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. गत दाेन वर्षांत अशा आराेपींवर कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र, तरीही तस्करीचा हा गाेरखधंदा सुरूच आहे.
कारवाईसाठी राबविली माेहीम
तत्कालीन पाेलीस अधीक्षक तथा आता अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक असलेले चंद्रकिशाेर मीना यांनी विशेष माेहीम राबवित देशी कट्टे व पिस्तूलची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांचे कंबरडे माेडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला हाेता. शेगावातून अकाेल्यात येणारे युवक तसेच आकाेट फैल परिसरात कारवाई करीत देशी कट्टे व पिस्तूल जप्त करण्याचा सपाटाच लावण्यात आला हाेता.