मांडूळ जातीच्या सापाची तस्करी; दोघांना अटक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 10:21 AM2020-08-25T10:21:24+5:302020-08-25T10:21:32+5:30
मांडूळ जातीच्या साप घेऊन जाणारे विकास श्रीराम सावळे व कृष्णा गणेश गुर्जर या दोघांना अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पारस येथील एमएसईबी कॉलनीमधील दोघे जण मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करून या सापाची विक्रीसाठी अवैधरीत्या वाहतूक करीत असताना या दोघांना पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुखमिलिंदकुमार बहाकर यांच्या पथकाने सोमवारी रात्री उशिरा अकोल्यातून अटक केली. काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणाऱ्या मांडूळ जातीच्या साप घेऊन जाणारे विकास श्रीराम सावळे व कृष्णा गणेश गुर्जर या दोघांना अटक केली.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक मिलिंदकुमार बहाकार यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी पारस येथून दुचाकीने अकोल्यात मांडूळ जातीचा साप घेऊन येणाºया दोघांना पोलिसांनी सापळा लावून पकडले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेल्या एका स्कूल बॅगमध्ये दुर्मिळ मांडूळ जातीचा साप आढळला. दोन्ही आरोपींनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी मांडूळ जातीचा साप असल्याचे सांगत विक्रीकरिता घेऊन जात असल्याचे कबूल केले. पोलिसांनी या प्रकरणी पारस येथील एमईसीबी कॉलनीत रहिवासी असलेल्या विकास श्रीराम सावळे (२१) व कृष्णा गणेश गुर्जर (२६) या दोघांना अटक केली. त्यांची दुचाकीही जप्त करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.