...तर कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबू शकतात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 10:28 AM2020-09-11T10:28:42+5:302020-09-11T10:28:53+5:30
सर्वाधिक रुग्ण हे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन ते चार दिवसातच मृत्यू पावल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली तर दुसरीकडे कोरोना बाधितांचा जिल्ह्यातील मृत्यूदर ही वाढत आहे. या वाढत्या मृत्यूदराला उशिरा रुग्णालयात दाखल होण्याची मानसिकताही कारणीभूत ठरत आहे. लवकर निदान झाले तर कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबु शकतात. गेल्या सात दिवसात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांंची हिस्ट्री तपासली असता, सर्वाधिक रुग्ण हे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन ते चार दिवसातच मृत्यू पावल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात कोरोनाची लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ही रुग्णांची संख्या मोठी आहे; मात्र काही प्रमाणात लक्षणे आढळल्यानंतरही काही रुग्ण कोरोनाच्या धास्तीमुळे उपचारासाठी उशिरा रुग्णालयात दाखल होतात. उपचार करण्यास डॉक्टरांना दोन-चार दिवसही मिळत नाही. अशाच रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूदर रोखण्यासाठी लवकर निदान होणे आणि तातडीने उपचार सुरू होणे आवश्यक आहे. लक्षणे दिसताचक्षणी लगेच कोरोना चाचणी केली नाही तर संभाव्य धोका कमी होतो. केवळ कोरोनाच्या धास्तीमुळे घरीच बसणे जीवघेणे ठरू शकते. प्राथमिक लक्षणे आढळल्यावर चाचणीअंती रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांना किमान पाच ते सहा दिवस उपचारासाठी मिळाले तरी मृत्यू रोखता येवू शकतात.
प्राथमिक लक्षणे दिसून लागताच कोरोनाची चाचणी करुन घ्या. लवकर निदान झाल्यास रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यास कोरोनाचा प्रभाव फुफ्फूसावर होतो. तेव्हा रुग्णाला वाचविणे मोठे जोखमिचे होते. लक्षणे दिसताच कोरोना चाचणी करुन घेतली तर लवकर उपचार सुरु करता येईल.
- डॉ. मिनाक्षी गजभिये,
अधिष्ठाता, जीएमसी.