... तर ते ५७ जण ठरू शकतात ‘ओमायक्रॉन’चे सुपर स्प्रेडर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 10:53 AM2021-12-23T10:53:56+5:302021-12-23T10:55:35+5:30
Corona Cases in Akola : विदेशातून जिल्ह्यात आलेल्या ५७ जणांनी अकोलेकरांच्या चिंतेत भर टाकली आहे.
- प्रवीण खेते
अकोला : विदेशातून आलेली एक युवती कोविड पॉझिटिव्ह आली असून, तिच्या ओमायक्रॉन चाचणी अहवालाची अजूनही प्रतीक्षा आहे. ओमायक्रॉनचं सावट असताना विदेशातून जिल्ह्यात आलेल्या ५७ जणांनी अकोलेकरांच्या चिंतेत भर टाकली आहे. या ५७ जणांशी आराेग्य विभागाचा अजूनही संपर्क झालेला नाही. त्यापैकी एकही पॉझिटिव्ह असल्यास ती व्यक्ती ‘ओमायक्रॉन’चा सुपर स्प्रेडर ठरू शकते. हा अनर्थ टाळण्यासाठी विदेशातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीने आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे. ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. विदेशातून येणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधून प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह येणाऱ्या व्यक्तीचा ‘आरएनए’ सॅम्पल ओमायक्रॉन निदानासाठी पुण्याला पाठविण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणा सतर्कता बाळगत असली, तरी विदेशातून आलेल्या काही नागरिकांच्या बेफिकिरीमुळे अकोलेकरांवर ‘ओमायक्रॉन’चे संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यंत विदेशातून आलेल्या नागरिकांपैकी एकाचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला असून, ओमायक्रॉन चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. अशातच विदेशातून आलेले ५७ नागरिक अजूनही आराेग्य विभागाच्या संपर्का बाहेर आहे. यातील एक व्यक्तीही ओमायक्रॉन पॉझिटिव्ह असल्यास ती ओमायक्रॉनचा सुपर स्प्रेडर ठरू शकते, असा धोका तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
विदेशातून आलेल्या लोकांची स्थिती
आतापर्यंत विदेशातून आलेले - २९३
संपर्क झालेले - २१६
इतर जिल्ह्यातील - २०
संपर्क न झालेले - ५७
चुकीचा संपर्क क्रमांक किंवा मोबाईल बंद
संपर्क न झालेल्या ५७ नागरिकांपैकी काही नागरिकांचे संपर्क क्रमांक चुकीचे असून, काहींचा मोबाईल क्रमांक बंद येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. काहींचा पत्ता योग्य नसल्याचीही माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या व्यक्तींशी संपर्क साधणे कठीण जात असल्याची माहिती आहे.
ओमायक्रॉनच्या बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते ओळखू येत नाहीत. त्यामुळे विदेशातून आलेल्या प्रत्येक नागरिकाने आरोग्य विभागाशी संपर्क साधून काेविड चाचणी करून घ्यावी. आतापर्यंत २१६ नागरिकांशी आरोग्य यंत्रणेचा संपर्क झाला असून, ५७ नागरिक अजूनही नॉट रिचेबल आहेत. यापैकी एकही नागरिक ओमायक्रॉन बाधित असल्यास तो ओमायक्रॉनचा सुपर स्प्रेडर ठरू शकतो. त्यामुळे संपर्क न झालेल्या नागरिकांनी समाजहित बाळगून स्वत:हून आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, सार्वजनिक आरोग्य सेवा, अकोला मंडळ