‘ओपन स्पेस’वर शोषखड्ड्यांसाठी मुहूर्तच सापडेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 03:11 PM2018-06-15T15:11:50+5:302018-06-15T15:11:50+5:30
पावसाचे दिवस लक्षात घेता, ओपन स्पेसवर शोषखड्डे करण्यासाठी प्रशासनासह नागरिकांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. तूर्तास या कामासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याचे दिसून येत आहे.
अकोला: शहराची भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी जलपुनर्भरणाची नितांत आवश्यकता आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या संदर्भात नागरिकांना माहिती देण्यासाठी महापालिकेत कक्षाचे गठन करण्यासोबतच शहरातील ओपन स्पेसवर शोषखड्डे करण्याला प्रशासन प्राधान्य देणार असल्याची भूमिका प्रशासनाने घेतली होती. पावसाचे दिवस लक्षात घेता, ओपन स्पेसवर शोषखड्डे करण्यासाठी प्रशासनासह नागरिकांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. तूर्तास या कामासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याचे दिसून येत आहे.
भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अकोलेकरांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने वेळोवेळी केले आहे. महान धरणात उपलब्ध असलेला जलसाठा व शहराच्या भूजल पातळीत घसरण झाल्यामुळे अकोलेकरांना पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे. भूजल पातळीत वाढ करण्यासाठी पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग)करण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासोबतच प्रत्यक्षात कृती करण्याच्या उद्देशातून महापालिका प्रशासनाने पुढाकार घेत मध्यंतरी मनपाच्या मुख्य सभागृहात कार्यशाळेचे आयोजन केले होते. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याने पावसाचे पाणी जमिनीत न मुरता नाल्यांद्वारे वाहून जात असल्याचे चित्र दिसून येते. यामुळे शहराच्या भूजल पातळीत घसरण होत आहे. पाण्याचा बेसुमार उपसा व वापर होत असून, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नागरिकांनीच जागरूक होण्याची गरज आहे. अशा स्थितीत छतावरील पाण्याचे नियोजन करून ते बोअर किंवा विहिरीपर्यंत पोहोचविण्यासाठी जल पुनर्भरणाची नितांत आवश्यकता आहे. भूजल सर्वेक्षण विभागाकडून शहरात ५० ठिकाणी विशिष्ट पद्धतीचे शोषखड्डे तयार केले जातील. यादरम्यान, मनपा प्रशासनानेसुद्धा शहरातील ओपन स्पेसवर शोषखड्डे करणार असल्याचे स्पष्ट केले होते. अद्यापपर्यंत मनपाने किती ओपन स्पेसवर शोषखड्डे तयार केले, याची माहिती उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. पावसाचे दिवस लक्षात घेता प्रशासनाने शोषखड्डे खोदण्यास सुरुवात करण्याची मागणी होत आहे.
जलपुनर्भरणाबद्दल संभ्रम
छतावरील पाणी जमिनीत मुरवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करायचे, याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येते. छतावरील पाण्याचा शोषखड्डा बोअरजवळ करायचा का, घरापासून किती अंतरावर खड्डा खोदण्याची गरज आहे, खड्ड्यासाठी कोणते साहित्य वापरायचे आणि त्यासाठी लागणारा एकूण खर्च किती आदी प्रश्न पाहता नागरिक आखडता हात घेत असल्याचे चित्र आहे. यासाठी आता प्रभागातील नगरसेवकांनी समोर येऊन रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांना कुशल कामगार उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.