सर्पमित्र बाळ काळणे कर्करुग्णांना देताहेत जगण्याचे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 02:30 PM2020-02-09T14:30:05+5:302020-02-09T14:30:12+5:30
सर्पतज्ज्ञ बाळ काळणे यांनी कर्करोगालाही पळवून लावल्याच्या अभिनव संदेशाने व्याख्यानातील श्रोते भारावून जात आहेत.
अकोला : कर्करोगाशी कडवी झुंज देत असलेले अकोल्यातील सर्पतज्ज्ञ बाळ काळणे आता गत काही दिवसांपासून कर्करुग्णांना धीर देत कर्करोगासंदर्भात जाहीर जनजागृती करीत आहेत. वन्यजीवांशी दोन हात करणारे काळणे, कर्करोगाशी कसा संघर्ष करीत आहेत, याची उदाहरणे ते जनतेला देत आहेत. मराठवाड्याच्या बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड परिसरात पाच दिवसांत त्यांनी जनजागृतीपर ११ व्याख्याने केली.
धावतो माझा मनोरथ मोडलेला, मी न झुंजीचा इरादा सोडलेला... दूरचे तारे जरी देतात हाका, राहतो मातीसवे मी जोडलेला... या गझलेच्या ओळीप्रमाणे बाळ काळणेंच्या आयुष्याचा प्रवास अलीकडे सुरू आहे. अकोल्यात कुठेही सर्प निघो, अकोलेकरांच्या तोंडून पहिले नाव बाळ काळणे यांचेच येते. सामाजिक बांधीलकीतून प्रकाशझोतात आलेल्या बाळ काळणेंना गतवर्षी गळ्याच्या कर्करोगाने ग्रासले; मात्र त्यांनी हिंमत सोडली नाही. काळणेंवर प्रेम करणाऱ्या मित्रमंडळींनी आर्थिक आणि वैद्यकीय मदत करून त्यांचे प्राण वाचविले. काळणे कर्करोगासोबतचा लढा जिंकत असतानादेखील त्यांनी सर्प पकडण्याची लोकसेवा सुरूच ठेवली. दरम्यान, अमरावती येथील डॉ. अविनाश सावजींनी काळणे यांना कर्करोगाविषयीचे अनुभव लोकांना सांगण्यास प्रवृत्त केले. अत्यंत मार्मिक आणि हदयस्पर्शी होणारा काळणे यांचा संवाद जनजागृतीसाठी परिणामकारक ठरत असल्याचे त्यांना लोकांनी सांगितले. लोकांच्या भावनेची कदर करीत सर्पतज्ज्ञ काळणे यांनी कर्करुग्णांना धीर देत जगण्याच बळ देणं सुरू केलं. आता त्यांना राज्यातील विविध ठिकाणाहून व्याख्याने देण्यासाठी बोलाविले जात आहे. मराठवाड्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, विक्रीकर कार्यालयात त्यांची व्याख्याने झाली. बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड परिसरात सातत्याने व्याख्याने होत आहेत. पाच दिवसांत त्यांनी जवळपास ११ व्याख्याने केली. वाघ, माकड, अजगर, नाग आदी वन्य जीवांना न घाबरणाºया सर्पतज्ज्ञ बाळ काळणे यांनी कर्करोगालाही पळवून लावल्याच्या अभिनव संदेशाने व्याख्यानातील श्रोते भारावून जात आहेत.
हजारो विषारी सर्पांना आतापर्यंत जीवनदान देत असताना मी कधी घाबरलो नाही. कर्करोगाने ग्रासल्यानंतर मी दररोज मृत्यू अनुभवत आहे. त्यामुळे पुढचे संपूर्ण आयुष्य लोकसेवेतच घालविणार आहे.
-बाळ काळणे, मानद वन्यजीव संरक्षक, अकोला.