तीन तालुक्यांतील ‘नरेगा’ कामांचे ‘सोशल आॅडिट’ पूर्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 03:37 PM2019-09-16T15:37:32+5:302019-09-16T15:37:38+5:30
आॅडिट’चा अहवाल लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसह केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय आणि राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
- संतोष येलकर
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) जिल्ह्यातील अकोला, पातूर व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांत २०१८-१९ या वर्षात विविध यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण (सोशल आॅडिट) १३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आले असून, या ‘सोशल आॅडिट’चा अहवाल लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसह केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय आणि राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
शासनाच्या ग्रामविकास विभाग व सामाजिक अंकेक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) जिल्ह्यातील अकोला, पातूर व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांत २०१८-१९ या वर्षांत विविध यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या ‘नरेगा’ कामांचे ‘सोशल आॅडिट’ २८ आॅगस्ट ते १३ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले.
त्यामध्ये तीनही तालुक्यांत ग्रामपंचायतनिहाय यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या ‘नरेगा’ कामांची पाहणी ग्राम साधन व्यक्तींच्या पथकांमार्फत करण्यात आली. तसेच करण्यात आलेल्या कामांच्या ‘रेकॉर्ड’ची तपासणी करण्यात आली. अकोला, पातूर व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांतील १२० ग्रामपंचायती अंतर्गत ‘नरेगा’ कामांचे ‘सोशल आॅडिट’ १३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आले असून, या सोशल आॅडिटचा अहवाल जिल्हा सामाजिक अंकेक्षकांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांसह केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय, राज्य शासनाचे सामाजिक अंकेक्षण संचालनालय, ग्रामविकास विभाग व रोजगार हमी विभागाकडे लवकरच सादर करण्यात येणार आहे.
तपासणी अहवालावर घेतली जनसुनावणी!
तीन तालुक्यांतील ‘नरेगा’ कामांच्या ‘सोशल आॅडिट’मध्ये करण्यात आलेल्या तपासणी अहवालावर ११ ते १३ सप्टेंबर दरम्यान जनसुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये ११ सप्टेंबर रोजी पातूर, १२ सप्टेंबर रोजी मूर्तिजापूर व १३ सप्टेंबर रोजी अकोला पंचायत समिती सभागृहात जनसुनावणी घेण्यात आली. तपासणी अहवालाचे वाचन करून संबंधित अधिकाºयांचे मत नोंदविण्यात आले. तसेच शेतकरी व लाभार्थींच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या.
‘आॅनलाइन’ माहितीद्वारे ‘आॅडिट’ पूर्ण!
ग्रामसेवकांचा संप सुरू असल्याने जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील ‘नरेगा’ कामांच्या सोशल आॅडिटमध्ये ग्रामपंचायतींकडून कामांचे रेकॉर्ड उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे नरेगा कामांची प्रत्यक्ष पाहणी करून आणि कामांची ‘आॅनलाइन’ माहिती घेत, त्या आधारे नरेगा कामांचे ‘सोशल आॅडिट’ पूर्ण करण्यात आले.
‘या’ कामांची करण्यात आली तपासणी!
जिल्ह्यातील अकोला, पातूर व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांत २०१८-१९ या वर्षांत नरेगा अंतर्गत विविध यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात आले. त्यामध्ये सिंचन विहीर, घरकुल, शौचालय, पाणंद रस्ते, वृक्ष लागवड, शोषखड्डे, सलग समतल चर, रोपवाटिका, सार्वजनिक रस्त्यांवरील वृक्ष लागवड, तुती लागवड, फळबाग लागवड इत्यादी कामांची तपासणी करण्यात आली.