अकोला शहरातील रस्ते कामांचे ‘सोशल आॅडिट ’; आता नमुने तपासणीच्या अहवालाकडे लक्ष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 01:01 PM2018-07-30T13:01:53+5:302018-07-30T13:06:13+5:30
अकोला : शहरातील रस्ते कामांच्या सामाजिक व तांत्रिक अंकेक्षणात (सोशल आॅडिट) गत शुक्रवारपर्यंत सहा दिवसांच्या कालावधीत शहरातील सहा रस्ते कामांचे नमुने घेण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयात सीलबंद करून ठेवण्यात आले.
अकोला : शहरातील रस्ते कामांच्या सामाजिक व तांत्रिक अंकेक्षणात (सोशल आॅडिट) गत शुक्रवारपर्यंत सहा दिवसांच्या कालावधीत शहरातील सहा रस्ते कामांचे नमुने घेण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयात सीलबंद करून ठेवण्यात आले. घेण्यात आलेले नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने रस्ते कामांच्या नमुने तपासणीसह तपासणीचा अहवाल केव्हा प्राप्त होणार, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
शासनाकडून प्राप्त निधीतून शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यानुषंगाने शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या आणि सुरू असलेल्या रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी सामाजिक व तांत्रिक अंकेक्षण (आॅडिट) करण्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत १६ जुलै रोजी काढले होते. त्यानुसार शहरातील रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी शहरातील सहा रस्ते कामांचे नमुने २२ ते २७ जुलै या कालवधीत घेण्यात आले. सहा दिवसांत शहरातील रस्ते कामांचे तीन पथकांमार्फत घेण्यात आलेले ७६ नमुने सीलबंद करून, जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. रस्ते कामांच्या या नमुन्यांची तपासणी शासकीय प्रयोगशाळेत संबंधित तज्ज्ञांच्या पथकांमार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी सीलबंद करण्यात आलेले रस्ते कामांचे नमुने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संबंधित प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने तपासणीसाठी रस्ते कामांचे नमुने प्रयोगशाळेकडे केव्हा पाठविण्यात येणार आणि तपासणीचा अहवाल केव्हा प्राप्त होणार, याकडे आता शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
१ आॅगस्ट रोजी नमुने तपासणीसाठी पाठविणार?
रस्ते कामांच्या ‘सोशल आॅडिट’मध्ये घेण्यात आलेले सहा रस्ते कामांचे ७६ नमुने सीलबंद करून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बुधवार, १ आॅगस्ट रोजी नमुने तपासणीसाठी संबंधित प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
नमुने घेण्यात आलेले असे आहेत रस्ते!
शहरातील रस्ते कामांच्या ‘सोशल आॅडिट’मध्ये सहा रस्ते कामांचे ७६ नमुने तीन पथकांमार्फत घेण्यात आले. त्यामध्ये मुख्य डाकघर ते सिव्हिल लाइन चौक, टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक, अग्रसेन चौक ते दुर्गा चौक, माळीपुरा ते मोहता मिल चौक, अशोक वाटिका ते सरकारी बगीचा आणि गोरक्षण रोड (नेहरू पार्क ते महापारेषण कार्यालयापर्यंत) इत्यादी रस्ते कामांचा समावेश आहे.