शहरातील रस्ते कामांचे होणार ‘सोशल आॅडिट’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:17 PM2018-07-17T12:17:03+5:302018-07-17T12:20:52+5:30
अकोला : शासनाच्या वैशिष्ट्येपूर्ण निधीतून अकोला शहरात पूर्ण करण्यात आलेल्या रस्ते कामांसह सुरू असलेल्या रस्ते कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात येणार आहे.
अकोला : शासनाच्या वैशिष्ट्येपूर्ण निधीतून अकोला शहरात पूर्ण करण्यात आलेल्या रस्ते कामांसह सुरू असलेल्या रस्ते कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात येणार आहे. बिगर राजकीय अकोलेकर नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून रस्ते कामांचे आॅडिट करण्यात येणार असल्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी काढले.
अकोला शहरातील रस्ते विकास कामांसह मनपा हद्दवाढीत समाविष्ट भागात नागरी सोयी-सुविधांच्या विकास कामांकरिता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शासनाकडून विशेष अर्थसहाय्य योजनेंतर्गत निधी प्राप्त करून दिला आहे. शासनामार्फत खड्डेमुक्त रस्ते अभियान राबविण्यात येत असून, या अभियानांतर्गत शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे; परंतु मागील एक वर्षात अकोला शहरात काँक्रिटीकरण करून कामे पूर्ण करण्यात आलेले रस्ते ठिकठिकाणी खराब झाल्याचे दिसून येत आहे. वर्षभरातच रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. शासनाच्या निधीतून करण्यात येणारी रस्त्यांची कामे गुणवत्तेप्रमाणेच पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने शहरात पूर्ण करण्यात आलेल्या आणि सुरू असलेल्या रस्ते कामांचे ‘सोशल आॅडिट’ पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने करण्यात येणार आहे. प्रशासनातील संबंधित अधिकाºयांसह कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसलेले अकोलेकर नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून शहरातील रस्ते कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात येणार आहे, असे परिपत्रक जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १६ जुलै रोजी काढले.
पथकांमार्फत नमुने घेण्यात येणार
शहरातील रस्ते कामांच्या ‘सोशल आॅडिट’मध्ये रस्ते कामांची, कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात येणार असून, त्यासाठी पथकांमार्फत नमुने घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रथम नमुन्याची तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकामार्फत करण्यात येणार आहे. द्वितीय नमुने तपासणी प्रसिद्ध, विश्वसनीय व नि:पक्ष अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पथकामार्फत करण्यात येणार आहे. तिसरी नमुने तपासणी शहरातील सिव्हिल इंजिनीअर झालेले विद्यार्थी जे इतर ठिकाणी नोकरीवर आहेत; मात्र त्यांना या कामात सहभाग देण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनाकडे नाव नोंदणी करावी लागेल. चौथी नमुने तपासणी ज्या भागात रस्त्याची कामे सुरू आहेत, त्या भागातील नि:पक्ष असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनात व निरीक्षणात वैज्ञानिक पद्धतीने करण्यात येणार आहे. पाचवी नमुने तपासणी जिल्हा प्रशासनाकडून गोपनीय पद्धतीने गोपनीय पथकाद्वारे व वैज्ञानिक पद्धतीने करण्यात येणार आहे.
तांत्रिक व आर्थिक बाबींचीही तपासणी!
शहरातील रस्ते कामांच्या तपासणीत लेखाधिकारी व एक उप अभियंता यांच्या संयुक्त पथकाकडून रस्ते कामांच्या अंदाजपत्रकात नमूद केलेल्या तांत्रिक व आर्थिक बाबींची तपासणीही करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी घेणार पाच ठिकाणचे नमुने!
रस्ते कामांच्या ‘सोशल आॅडिट’मध्ये नमुना तपासणीत प्रारंभी जिल्हाधिकारी अथवा त्यांचे नामनिर्देशित अधिकाऱ्यांच्या निरीक्षणात प्रत्येक रस्त्यावरील पाच ठिकाणचे नमुने ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’मध्ये घेण्यात येतील. घेतलेले नमुने सीलबंद करून तपासणीसाठी संबंधित पथकाकडे दिले जातील. तसेच तपासणीत सर्व पथकांकडून घेण्यात आलेल्या नमुन्यांचे परीक्षण कोणत्या पद्धतीने व कोणत्या प्रयोगशाळेत करण्यात येणार, याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला देणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकाºयांनी परिपत्रकात नमूद केले आहे.
लोकप्रतिनिधींनीही व्यक्त केली नाराजी!
मागील एक वर्षात पूर्ण करण्यात आलेले रस्ते जागोजागी खराब झाल्याच्या मुद्यावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ही बाब प्रशासकीय कामकाजाला शोभणारी नसून, त्यामुळे जनसामान्यात शासनाची प्रतिमा मलीन होत असल्याचे, जिल्हाधिकाºयांनी परिपत्रकात म्हटले आहे.
नमुन्यांची तपासणी होणार ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’मध्ये!
शहरातील रस्ते कामांच्या ‘सोशल आॅडिट’मध्ये पथकांमार्फत नमुने घेण्यात येणार आहेत. नमुन्यांची तपासणी लोकाभिमुख पद्धतीने व्हावी, यासाठी नमुन्यांची तपासणी ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’मध्ये करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले.