पाणी टंचाईच्या कामांचे होणार सोशल आॅडिट; महापालिकेचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 02:32 PM2018-08-28T14:32:52+5:302018-08-28T14:33:01+5:30
नगरोत्थान योजनेच्या २ कोटी ५६ लाख निधीतून पाणी टंचाईची कामे करण्यात आली. यासर्व कामांचे सोशल आॅडिट करण्याचा निर्णय घेत प्रशासनाने खडकी येथील श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाज कार्य महाविद्यालयाची निवड केली आहे.
अकोला : उन्हाळ््यात शहरातील पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी मनपा प्रशासनाने नवीन सबमर्सिबल पंप, हातपंप उभारले. त्यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात १ कोटी २८ लाख, नंतर ६६ लाख मंजूर झाले होते. यासोबतच नगरोत्थान योजनेच्या २ कोटी ५६ लाख निधीतून पाणी टंचाईची कामे करण्यात आली. यासर्व कामांचे सोशल आॅडिट करण्याचा निर्णय घेत प्रशासनाने खडकी येथील श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाज कार्य महाविद्यालयाची निवड केली आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणात उन्हाळ््यात अत्यल्प जलसाठा उपलब्ध होता. ही बाब ओळखून मनपा प्रशासनाने ४ कोटी २३ लाखांचा प्रस्ताव तयार केला असता शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने १ कोटी २८ लाख रुपये मंजूर केले होते. या निधीतून १२० हातपंपांसाठी ७२ लाख रुपये, तर ७५ सबमर्सिबल पंपांसाठी ५६ लाख २५ हजारांची तरतूद केली होती. दुसºया टप्प्यात ६६ लाख मंजूर झाले. तसेच नगरोत्थान योजनेतून २ कोटी ५६ लाखांची तरतूद करण्यात आली. प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदारांच्या माध्यमातून ही कामे पूर्ण केली. आजरोजी २४० हातपंप व १५० सबमर्सिबल पंपांची कामे करण्यात आल्याची माहिती आहे. ही कामे योग्यरीत्या झाली किंवा नाहीत, हे तपासण्यासाठी प्रशासनाने सोशल आॅडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.