‘एकता’ वन महोत्सवातून सामाजिक सलोखा
By admin | Published: July 2, 2016 02:15 AM2016-07-02T02:15:46+5:302016-07-02T02:15:46+5:30
पोलीस दलाने लावली २0६९ झाडे.
अकोला : हरित महाराष्ट्राची संकल्पना साकारण्यासाठी राज्य शासनाने राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या अनुषंगाने १ जुलै रोजी वन महोत्सवादरम्यान अकोला पोलीस दलाच्यावतीने जिल्हाभरातील पोलीस ठाणी व चौक्यांच्या परिसरात २0६९ झाडे लावण्यात आली. वन महोत्सवाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून सर्वधर्मीय जनतेच्या सहभागातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हय़ात ज्या ठिकाणी जातीय तणावाच्या घटना वारंवार होतात, तेथे शांतता समिती सदस्य, पोलीस मित्र, प्रतिष्ठित नागरिक व ज्येष्ठ नागरिकांना ह्यएकता वृक्षारोपण कार्यक्रमासह्ण आमंत्रित करून सर्व धर्मियांमध्ये एकता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिक पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी वृक्षारोपण केले. अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर व बाळापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत देशमुख यांनी उरळ पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या हातरुण चौकात व बाळापूर पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण केले. शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी डाबकी रोड पोलीस ठाणे अंतर्गत येणार्या खैर मोहम्मद प्लॉट पोलीस चौक येथे वृक्षारोपण केले. आकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी आर. पी. मनवरे यांनी आकोट शहर पोलीस स्टेशन व तेल्हारा पोलीस स्टेशनांतर्गत येणार्या पंचगव्हाण पोलीस चौकीत वृक्षारोपण केले. पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) अरविंद पाटील यांनी पोलीस मुख्यालयात व पोलीस अधीक्षक कार्यालयात वृक्षारोपण केले. जिल्हय़ातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांनी त्यांच्या पोलीस ठाण्यांमध्ये वृक्षारोपण केले. वाहतूक शाखेचे प्रकाश सावकार यांनी वाहतूक शाखेच्या आवारात वृक्षारोपण केले.