उमेदवारांच्या विरोधात सोशल मीडियावर प्रचार!
By admin | Published: February 5, 2017 02:43 AM2017-02-05T02:43:44+5:302017-02-05T02:43:44+5:30
भाजपने घेतली बैठक; सोशल मीडियावरील प्रचाराला देणार चोख उत्तर.
अकोला, दि. ४-महापालिकेच्या निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून, एकमेकांना अडचणीत आणण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. हमखास निवडून येणार्या काही उमेदवारांच्या विरोधात आतापासूनच सोशल मीडियाद्वारे गरळ ओकण्याची कामे सुरू झाली असून, यासंदर्भात खबरदारीचा उपाय म्हणून भाजपच्यावतीने शनिवारी सिंधी कॅम्प परिसरात बैठक घेण्यात आल्याची माहिती आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज सादर केल्यानंतर त्या-त्या प्रभागांमध्ये राजकीय पक्षांचे उमेदवार नेमके कोण,याचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रत्येक समाज घटकाला सोबत घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी बहाल केल्याचे दिसून येते. एका प्रभागातून चार उमेदवारांना निवडून द्यावे लागणार असल्याने राजकीय पक्षांच्या पॅनेलमध्ये सर्वसमावेशक चार उमेदवारांना स्थान देण्यात आले. हा प्रयोग शहराच्या प्रत्येक प्रभागात झाल्याचे चित्र आहे. निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्यापूर्वीच हमखास निवडून येणार्या उमेदवारांच्या विरोधात राजकीय व्यूहरचना आखली जात असून, समाज बांधवांच्या मतांमध्ये फूट टाकण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. यावर वेळीच खबरदारी म्हणून शनिवारी भाजपच्यावतीने निवडणूक रिंगणात उभे असणार्या दक्षिण झोनमधील सर्व उमेदवारांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सिंधी कॅम्पस्थित हरदास भवनमध्ये ही बैठक पार पडल्याची माहिती आहे. या बैठकीत सोशल मीडियावरील प्रचाराला चोख उत्तर देण्याचीही व्यूहरचना आखल्याची माहिती आहे. दरम्यान दोन समाजात तेढ निर्माण करून सामाजिक वातावरण बिघडविण्याच्या कुटील राजकारण हाणून पाडण्यासाठी विचारमंथन करून पुढील दिशा ठरवण्यासाठी भाजपच्यावतीने उद्या, रविवारी सकाळी ११ वाजता निवडणूक रिंगणातील सर्व उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे.