‘समाजकल्याण’च्या कर्मचा-यांचे वेतनही काढले नाही!
By admin | Published: October 30, 2016 03:20 AM2016-10-30T03:20:06+5:302016-10-30T03:20:06+5:30
वसतिगृह अनुदान वाटपातील घोळ; वित्त व लेखा विभागाने घेतला धसका.
अकोला, दि. २९- जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातून वसतिगृहांना नियमबाह्यपणे वाटप झालेल्या अनुदानाच्या फायलींचा प्रचंड धसका वित्त व लेखा विभागाने घेतला. त्यामुळे वेतनाच्या फायलींनाही बाजूला ठेवत सर्वच कर्मचार्यांवर अविश्वास दाखवण्याचा प्रकार घडल्याने समाजकल्याण विभागातील कर्मचार्यांना दिवाळी विनावेतनाची साजरी करावी लागत आहे.
समाजकल्याण विभागाच्या १५ वसतिगृहांना अनुदान वाटप करताना मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांनी कोणताही नियम किंवा फाईल सादर करण्याची प्रक्रिया पार पाडली नाही. लाखो रुपयांच्या अनुदानाच्या फायलींची देयक नोंदवही आणि कार्यालयीन नोंद कुठेच नाही. त्यामुळे या नियमबाह्य प्रकाराला नागर यांनाही जबाबदार धरत मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी कारणे दाखवा नोटिस बजावली. त्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिल्याची माहिती आहे. मात्र, हा प्रकार उघड झाला असताना समाजकल्याण विभागाच्या कर्मचार्यांना वेतन देण्याचीही फाइल त्यांच्याकडे सादर झाली. त्यावर समाजकल्याण विभागाच्या कर्मचार्यांबाबत नकारात्मक भूमिका घेत ती बाजूला ठेवण्यात आली. त्यामुळे या विभागातील अनेक कर्मचार्यांचे वेतनच झाले नाही. त्यांना दिवाळीतही वेतनाचा फायदा घेता आला नाही.