जमिनीत ओलावा; रब्बी हंगामातील पेरणीला गती, ५८ टक्के पेरणी आटोपली
By रवी दामोदर | Published: December 9, 2023 06:38 PM2023-12-09T18:38:30+5:302023-12-09T18:38:52+5:30
हरभऱ्यासह गव्हाचे क्षेत्र वाढणार
अकोला : जिल्ह्यात गत आठवड्यात दि. २६ नोव्हेंबरनंतर झालेल्या अवकाळी पावसाने जमिनीमध्ये ओलावा वाढला. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणीला गती मिळाली असून, ५८ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. काही भागात अवकाळी पावसाचे पाणी साचल्याने त्या शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे आहे. यंदा हरभऱ्यासह गव्हाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
यंदा खरीप हंगामात मान्सूनला तीन आठवडे उशिरा प्रारंभ झाल्याने पेरण्यांना महिनाभर विलंब झाला. त्यामुळे सोयाबीनचा हंगामदेखील लांबल्यानेही रब्बी हंगामाच्या पेरण्या विलंबाने होत असल्याचे सांगण्यात येते. ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवस पावसात खंड असल्याने जमिनीचे पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा नाही. यामुळे रब्बी पेरण्यांचा टक्का कमी होता. मात्र, आता अवकाळी पावसाने जमिनीतला ओलावा काही प्रमाणात वाढला. त्यामुळे पेरण्यांची लगबग वाढली असून, शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात सरासरी १ लाख २१ हजार १०४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते, यंदा सुरुवातीला पेरणी थांबली होती, परंतू अवकाळी पावसाने ओलावा वाढल्याने गत आठवड्यात पेरणीचा टक्का वाढला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७१ हजार ३६२ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी आटोपली असून, त्यामध्ये सार्वाधिक ५५ हजार ८४६ हेक्टर क्षेत्र हरभऱ्याचे आहे. त्या पाठोपाठ गव्हाचे क्षेत्र आहे.
अनेक भागात हरभऱ्याची होणार दुबार पेरणी
रब्बी हंगामात जिल्ह्याचे प्रमुख पीक हरभरा असून, दरवर्षी हरभऱ्याचा पेरा वाढतो. यंदा रब्बी हंगामाच्या सुरुवातीला जमिनीत ओलावा कमी असल्याने काही बगायदार शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली होती. परंतू त्यानंतर गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचल्याने हरभऱ्यावर अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसानंतर धुके व ढगाळ वातावरण असल्याने हरभरा पिकावर रोप कुरतडणारी अळीचा (कटवर्म) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे हजारो हेक्टरवरील हरभऱ्याचे पीक धोक्यात आले असून, अनेक शेतकऱ्यांनी पीक मोडण्याला सुरुवात केली आहे.