उड्डाण पूल उभारणीसाठी सुरू झाली ‘सॉइल टेस्टिंग’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:44 PM2019-03-08T12:44:42+5:302019-03-08T12:44:58+5:30

१३४ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित उड्डाण पूल उभारणीच्या सॉइल टेस्टिंगचे नमुने घेण्यास गुरुवारी दुपारी सुरुवात झाली.

'Soil Testing' start for flyover bridge! | उड्डाण पूल उभारणीसाठी सुरू झाली ‘सॉइल टेस्टिंग’!

उड्डाण पूल उभारणीसाठी सुरू झाली ‘सॉइल टेस्टिंग’!

googlenewsNext

अकोला: तब्बल चार वर्षांपूर्वी उद्घाटित झालेल्या अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशनच्या बहुप्रतीक्षित उड्डाण पुलाच्या प्रत्यक्ष बांधकामाला आता सुरुवात होण्याचे चिन्ह दिसत आहे. १३४ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित उड्डाण पूल उभारणीच्या सॉइल टेस्टिंगचे नमुने घेण्यास गुरुवारी दुपारी सुरुवात झाली. हरियाणा राज्यातील हिस्सार येथील जान्डू कन्स्ट्रक्शन कंपनीची यंत्रणा यासाठी अकोल्यात दाखल झाली असून, त्यांनी गुरुवारी तीन अद्ययावत मशीनद्वारे प्रस्तावित उड्डाण पूल मार्गावरील विविध ठिकाणचे मातीचे नमुने घेतले गेले. त्यामुळे एप्रिलपर्यंत बहुप्रतीक्षित उड्डाण पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
२०१५ मध्ये केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अशोक वाटिका ते रेल्वेस्थानक या उड्डाण पुलाच्या बांधकामाचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर २०१८ च्या वर्षअखेरीस पत्रकार परिषद घेऊन बांधकामास मंजुरी दिल्याचे सांगितले गेले. चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर साडेतीन किलोमीटर अंतरापर्यंत विस्तारित होणाऱ्या या पुलाच्या उभारणीचा मुहूर्त निघाला अन् गुरुवारी ‘सॉइल टेस्टिंग’च्या कामास सुरुवात झाली. ‘सॉइल टेस्टिंग’च्या तीन अद्ययावत मशीन गुरुवारी अकोल्यात दाखल झाल्यात. या मार्गावर खोल बोअर करीत नमुने घेतले गेले.
लहान-मोठे दोन उड्डाण पूल उभारणीसाठी जवळपास ६३ खांब उभारले जाणार आहेत. प्रत्येक खांब उभारणीच्या ठिकाणचे त्यासाठी माती नमुने घेतले जाणार आहे. ‘सॉइल टेस्टिंग’चा एक नमुना घेण्यासाठी किमान एक ते दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ६३ ‘सॉइल टेस्टिंग’चे नमुने घेण्यासाठी कंपनी काही दिवसांत आणखी आठ मशीन शहरात आणणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. ‘सॉइल टेस्टिंग’चे ठिकठिकाणचे नमुने घेण्यासाठी कंपनीला एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे बोलले जात आहे. हे सर्व नमुने वाशी (मुंबई)च्या प्रयोगशाळेत पाठविले जाणार असून, नमुन्यांचा रिपोर्ट आल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. नमुना रिपोर्ट येईपर्यंत प्रस्तावित पुलाचे डिझाइन तयार केले जाणार आहे. जवळपास एप्रिल महिन्यात उड्डाण पुलाच्या बांधकामास सुरुवात होण्याचे संकेत आहेत.


 ‘टेस्टिंग’दरम्यान फुटली पाइपलाइन! 

अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहासमोर ‘सॉइल टेस्टिंग’च्या मशीनने मातीचे नमुने घेत असताना अकोला शहराची मुख्य पाणी पुरवठा पाइपलाइन फुटली. त्यामुळे या मार्गावर हजारो गॅलन पाणी वाया गेले. महापालिका प्रशासन अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात समन्वय नसल्याचा अभाव गुरुवारी दिसून आला. यासंदर्भात अकोला महापालिकेचे पाणी पुरवठा शहर अभियंता सुरेश हुंगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मुंबईत असल्याचे सांगितले. या लाइनवरील पाणी पुरवठा खंडित करण्याचे आल्याचेही त्यांनी सांगितले.


 विद्युत्त खांब आणि वृक्षतोडची परवानगी लागली मार्गी!

प्रस्तावित उड्डाण पूल मार्गावरील विद्युत्त खांब हटविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हालचाली सुरू केल्या आहे. सोबतच या मार्गावरील वृक्ष कटाईच्या परवानगीची जबाबदारी महापालिकेकडे सोपविली आहे. एका महिन्याच्या आत ही दोन्ही कामे पूर्ण होण्याची अपेक्षा कंत्राटदारास आहे.


- भूगर्भशास्त्रीय दृष्टिकोनातून उड्डाण पूल उभारणीसाठी मृद तपासणी महत्त्वाची असते. ही या कामाची पहिली पायरी आहे. गेल्या २२ फेब्रुवारीपासून या कंपनीला या कामासाठी नेमण्यात आले आहे. आता डिझाइन निर्मितीनंतर लगेच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
--विलास ब्राह्मणकर, प्रकल्प प्रमुख अभियंता, अमरावती.

 

Web Title: 'Soil Testing' start for flyover bridge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.