सोलापूर ते वाशिम; सदाभाऊंच्या दौऱ्यात ‘स्वाभिमानी’ची धास्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 02:24 PM2018-02-28T14:24:33+5:302018-02-28T14:24:33+5:30
अकोला: कृषी व पणन राजमंत्री सदाभाऊ खोत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद आता चांगला पेटला आहे. शनिवारी सोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ना. खोतांना काळ्या झेंड्यांसह गाजर दाखवून सरकारच्या विरोधात निषेध नोंदविला.
- राजेश शेगोकार
अकोला: कृषी व पणन राजमंत्री सदाभाऊ खोत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद आता चांगला पेटला आहे. शनिवारी सोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ना. खोतांना काळ्या झेंड्यांसह गाजर दाखवून सरकारच्या विरोधात निषेध नोंदविला. त्यानंतर खा. राजू शेट्टी व खोत यांच्या कार्यकर्त्यांनी थेट तोडफोडीची भूमिका घेतली. सदाभाऊंच्या विरोधातील ही धग थेट वाशिमपर्यंत कायम राहिल्यामुळेच पोलिसांनी स्वाभिमानीच्या पदाधिकाºयांना ना. खोतांच्या दौºयाआधीच नजरकैदेत टाकण्याचा पवित्रा घेतला.
वर्षभरापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे क्रमांक दोनचे नेते असलेल्या सदभाऊंना सत्तेचा मोह झाल्याचा आरोप संघटनेत होऊ लागला व त्यामधूनच खा. राजू शेट्टी व ना. खोतांचे संबंध ताणल्या गेले. अखेर ना. खोतांची संघटनेतून हकालपट्टी झाली. दुसरीकडे ना. खोत यांनी रयत क्रांती आघाडी नावाने आपली स्वतंत्र संघटना स्थापन करून राज्यभरात कार्यकर्त्यांचे जाळे उभारण्याची सुरुवात केली. आता या दोन्ही संघटनांमध्ये प्रचंड वितुष्ट निर्माण झाले आहे. स्वाभिमानीचे भक्कम अस्तित्व असलेल्या जिल्ह्यांमध्ये खोतांना होणारा स्वाभिमानीचा विरोधही तेवढाचा प्रभावी आहे, त्यामुळे पोलिसांनी आता दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. सोलापुरात परवा खोत-शेट्टी यांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडल्याने थेट कार्यालयांची तोडफोड होण्यापर्यंतच वाद उभ्या महाराष्टÑाने पाहिला.या प्रकरणाची शाई वाळण्याच्या आतच मंगळवारी ना. खोत यांचा वाशिम दौरा झाला. या दौºयामध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी विघ्न आणू नये म्हणून पोलिसांनी आधीच प्रमुख कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले; मात्र शेतकरी व राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी ना. खोतांना काळे झेेंडे दाखवून विरोधाची धग वाशिममध्येही कायम असल्याचे दाखवून दिले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वाशिममध्ये आता चांगलाच जोर वाढत आहे. खुद्द खा. राजू शेट्टी व स्वाभिमानीचे युवा नेते, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत येथील संघटना चांगली बांधली आहे. आत्महत्या केलेले शेतकरी दत्ता लांडगे यांच्या कुटुंबीयांसाठी स्वाभिमानीने उभारलेला लढा असो की कापूस-सोयाबीन परिषद असो, अनेक कार्यक्रमांतून युवकांची मोठी फळी स्वाभिमानीने वाशिममध्ये उभारली आहे. त्यामुळेच ना. खोतांच्या दौºयाआधीच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्याचा पवित्रा पोलिसांनी घेतला आहे.