नऊ हजारावर शेतकऱ्यांना सौर कृषिपंपांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:14 AM2021-07-11T04:14:37+5:302021-07-11T04:14:37+5:30
अकोला : सिंचनासाठी शेतकऱ्यांना विद्युत कृषिपंप जोडणी देण्यात मर्यादा येत असल्याने यावर उपाय म्हणू राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर ...
अकोला : सिंचनासाठी शेतकऱ्यांना विद्युत कृषिपंप जोडणी देण्यात मर्यादा येत असल्याने यावर उपाय म्हणू राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेला आता शेतकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत येणाऱ्या अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत ९,३४३ शेतकऱ्यांना सौर कृषिपंपांचा लाभ देण्यात आला असून, यापैकी ८,६२६ शेतकऱ्यांच्या शेतात सौर पंप कार्यान्वित झाले आहेत.
राज्यात कृषी पंपांना विद्युत जोडणी देण्यासाठी रोहित्र उभारून लघुदाब वाहिनीद्वारे वीज पुरवठा केला जातो. एका रोहित्रावर जोडण्यांचा भार वाढल्याने कमी दाबाने वीज पुरवठा होणे, वारंवार रोहित्र बिघडणे, विद्युत अपघात यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे सिंचनात अडथळे येतात. शिवाय ज्या भागात विजेचे जाळे नाही त्या ठिकाणी सिंचनासाठी डिझेल पंपांचाही वापर होतो. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत महाविरतणच्या अकोला परिमंडळातील अकोला जिल्ह्यात १२८१, बुलडाणा जिल्ह्यात ३५१७, तर वाशिम जिल्ह्यात ४५४५ अशा एकूण ९३४३ शेतकऱ्यांना सौर कृषिपंपांचा लाभ देण्यात आला आहे. यापैकी अकोला जिल्ह्यात सर्वच्या सर्व म्हणजे १२८१ पंप कार्यान्वित झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ३२१०, तर वाशिम जिल्ह्यात ४,१३५ सौर पंप शेतात बसवून कार्यान्वित करण्यात आले आहेत.
लाभार्थी हिस्सा केवळ दहा टक्के
या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीला केवळ दहा टक्के, तर अनुसूचित जाती व जमाती गटातील लाभार्थींना केवळ पाच टक्के रक्कम भरावी लागते. उर्वरित रकमेची पूर्तता शासनाकडून केली जाते. यामध्ये मिळणाऱ्या कृषिपंपाची आयुमर्यादा २५ वर्षे असून, देखभाल दुरुस्तीचा कालावधी पाच वर्षांचा आहे. सौर पॅनलचा कालावधी दहा वर्षांचा आहे.