अकोला जिल्ह्यात २५ हजार घरांच्या छतावर होणार सौर ऊर्जानिर्मिती
By Atul.jaiswal | Published: January 31, 2024 05:42 PM2024-01-31T17:42:08+5:302024-01-31T17:43:03+5:30
‘सुर्योदय' योजना, केंद्र शासनाच्या योजनेत अकोल्याचा समावेश.
अतुल जयस्वाल,अकोला : केंद्र शासनाच्या 'सुर्योदय' योजनेत राज्यातील सात जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून, यामध्ये अकोला जिल्ह्याचाही समावेश आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २५ हजार घराच्या छतावर सौर पॅनलच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे.
देशात एक कोटी घराच्या छतांवर सौर पॅनेलच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असलेली 'सुर्योदय' योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. योजनेत राज्यातील पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, नागपूरबरोबरच अकोला जिल्ह्यांचाही समावेश आहे. सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या वीजेमुळे ग्राहकाला नेहमीचा वीजपुरवठा कमी वापरावा लागतो व वीजबिलात कपात होते.
ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीज देयकात सवलत देते. यातून कधी कधी ग्राहकांना शून्य रकमेचे वीजबिलही येते. सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्याचा उपयोग पुढे दीर्घकाळासाठी होत राहतो. सुर्योदय योजनेत छतावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी कोणत्याही बँकेकडून हप्त्यावर कर्ज उपलब्ध होऊ शकते. सौर ऊर्जानिर्मितीने वीज देयकाच्या वाचणा-या पैश्यातून कर्जफेड शक्य आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक सुलभरीतीने आर्थिक भुर्दंडाविना ही सुविधा वापरता येते.
केंद्र शासनाकडून अनुदान :
१ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के अनुदान, ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान, सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह निवासी गृहनिर्माण संस्था या ग्राहकांना २० टक्के अनुदान मिळते. तीन किलोवॅटपर्यंत क्षमतेचे पॅनेल बसविण्यासाठी सुमारे १ लाख ५७ हजार खर्च येतो व त्यामध्ये सुमारे ५४ हजार रूपयांपर्यंत अनुदान मिळते.
सौर ऊर्जेचे अनेक फायदे आहेत. यासाठी केंद्र शासनाकडून अनुदानही देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्राहकांनी योजनेत सहभागी व्हावे.-अजीत कुंभार, जिल्हाधिकारी, अकोला