सौर दिव्यांचा गुणवत्ता तपासणी अहवाल मागविला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 02:49 PM2018-11-12T14:49:10+5:302018-11-12T14:49:17+5:30
अकोला : मिर्झापूर ग्रामपंचायतमध्ये लावण्यात आलेल्या सौर पथदिव्यांचा गुणवत्ता तपासणी अहवाल ग्रामसेवकाने १ नोव्हेंबर रोजीच्या पत्रातून महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास अभिकरणाकडून मागविला आहे.
अकोला : मिर्झापूर ग्रामपंचायतमध्ये लावण्यात आलेल्या सौर पथदिव्यांचा गुणवत्ता तपासणी अहवाल ग्रामसेवकाने १ नोव्हेंबर रोजीच्या पत्रातून महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास अभिकरणाकडून मागविला आहे. त्याचवेळी मोजमापपुस्तिका, काम पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रामध्ये त्या बाबी आधीच नमूद असल्याने या प्रकरणात पाणी कुठे मुरत आहे, ही बाब आता जिल्हा परिषद प्रशासनाच्या चौकशीतून पुढे येण्याची शक्यता आहे.
सौर ऊर्जा पथदिव्यांचे देयक अदा करण्यासाठी ग्रामसेवक आर. आर. देशमुख यांच्याकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांच्याकडे २७ आॅक्टोबर रोजी करण्यात आली. त्यामध्ये ग्रामसेवकाने देयक रोखून ठेवले आहे. पथदिव्यांबद्दल आक्षेप नसताना देयक अदा करण्यास विलंब केला जात आहे, असे तक्रारीत पुरवठादाराने नमूद केले. त्यावर ग्रामसेवक देशमुख यांनी १ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास अभिकरणाला पत्र दिले. पुरवठादाराने ग्रामपंचायतमध्ये लावलेल्या सौर पथदिव्यांची गुणवत्ता, इतर तांत्रिक बाबींचा तपासणी अहवाल देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्या अहवालानंतरच देयक देण्याचा पवित्रा देशमुख यांनी घेतला. ग्रामसेवकाने पत्रात मागविलेली माहिती महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाने प्रमाणित केलेल्या मोजमापपुस्तिका, काम पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रातच नमूद आहे. त्यामुळे या प्रकरणाची जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी पुरवठादाराने केली आहे.