विद्यार्थ्यांनी बनविले सौरऊर्जा अभ्यास दिवे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:37 PM2019-11-26T12:37:12+5:302019-11-26T12:37:27+5:30
हा नावीन्यपूर्ण उपक्रम मुख्याध्यापिका मनीषा शेजोळे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.
अकोला : बालदिन व बाल हक्क व सुरक्षा सप्ताहांतर्गत जिल्हा परिषद शाळा पाचमोरी येथे ‘आम्ही सौरदूत’ हा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सौरऊर्जा अभ्यास दिवे तयार केले. हा नावीन्यपूर्ण उपक्रम मुख्याध्यापिका मनीषा शेजोळे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यवस्थापन समिती अध्यक्षा रेखा कांबळे होत्या. यावेळी मुख्याध्यापिका शेजोळे यांनी पंडित नेहरू यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. तसेच मुलांचे हक्क व संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी पंडित नेहरूंची वेशभूषा धारण करून भाषणे दिली. मुलांनी कृतियुक्त गीते सादर केली. कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पंडित नेहरू यांचा जीवनपट दाखविण्यात आला. सप्ताहांतर्गत शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये ‘तारे जमीन पर’ शालेय चित्र रंगवा स्पर्धा, टाकाऊतून टिकाऊ साहित्य तयार करणे, पुष्पगुच्छ निर्मिती स्पर्धा, घोषवाक्य, बालसभा, स्वच्छता मोहीम, आनंददायी खेळ, दप्तराविना शाळा, आरोग्य व पोषक आहार माहिती आदींविषयी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रेखा कांबळे, प्रमुख अतिथी शिक्षणतज्ज्ञ तथा पोलीस पाटील सय्यद बादशाह, बबिता खंडारे, सुमित्रा निंबाळकर, बेबी वानखडे, उज्ज्वला जोशी यांच्यासह पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांसाठी मिनी बचत बँक
विद्यार्थ्यांमध्ये बचतीचे संस्कार रुजावे या अनुषंगाने शाळेत मिनी बचत बँक सुरू करण्यात आली. खाऊच्या पैशाचा योग्य विनियोग व्हावा. गणिती क्रियांच्या सरावासोबतच आर्थिक व्यवहाराची ओळख व्हावी या उद्देशाने मुख्याध्यापिका मनीषा शेजोळे यांनी ही बँक सुरू केली. तसेच शैक्षणिक सामग्री सहज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांवर जबाबदारी निश्चित करून विद्यार्थी स्टोअर्स सुरू केले.
विद्यार्थ्यांना दिले स्टडी लॅम्प निर्मितीचे प्रशिक्षण
‘आम्ही सौरदूत’ उपक्रमांतर्गत मुख्याध्यापिका मनीषा शेजोळे यांनी विद्यार्थ्यांसाठी सोलर अॅम्बेसेडर वर्कशॉप घेतले. यावेळी त्यांनी स्वत: विद्यार्थ्यांना सोलर स्टडी लॅम्प बनविण्याचे प्रशिक्षण दिले. तसेच अपारंपरिक ऊर्जा संवर्धन व वापर, वातावरणातील बदल व पर्यावरणावर होणारा प्रदूषणाचा परिणाम रोखणे, सौर ऊर्जेचा वापर ग्रामीण भागापर्यंत पोहोचविणे तसेच राइट टू लाइट या बाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.