सैनिक नवरदेवाचा शहिदाच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:14 AM2021-01-09T04:14:57+5:302021-01-09T04:14:57+5:30

अकोटः देशाच्या सीमेवर लढताना जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना कृतज्ञतेच्या भावनेतून विविध क्षेत्रातून राष्ट्रप्रेमींचा आधार मिळताे; मात्र ज्या क्षेत्रात ...

Soldier Navradeva's helping hand to the families of the martyrs | सैनिक नवरदेवाचा शहिदाच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

सैनिक नवरदेवाचा शहिदाच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

Next

अकोटः देशाच्या सीमेवर लढताना जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना कृतज्ञतेच्या भावनेतून विविध क्षेत्रातून राष्ट्रप्रेमींचा आधार मिळताे; मात्र ज्या क्षेत्रात आपण कार्य करताे, त्या क्षेत्रातील कुटुंबीयांच्या मदतीला धावून जाणे जगावेगळेच. अशाच प्रकारे नवरदेव झालेल्या अकाेट येथील सैनिकाने अमरावती जिल्ह्यातील शहिदाच्या कुटुंबीयांना मदतीचा हात दिला आहे. शुभम साहेबराव बोरोडे (कोब्रा कमांडो) या जवानाने उपक्रमातून प्रेरणावाट निर्माण केली आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोट येथील रहिवासी तथा केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) कार्यरत असलेल्या एका जवानाने आपल्या लग्नसमारंभात अनोखा आदर्श घालून दिला. या सैनिकाने स्वतःच्या लग्नातील आशीर्वादाचे पैसे व वऱ्हाडी मंडळीकरिता सन्मान मदतपेटी ठेवली होती. यावेळी जमा झालेली संपूर्ण रक्कम अमरावती जिल्ह्यातील पिंपळखुटा येथील शहीद जवान कैलासराव दहीकर यांच्या कुटुंबाला मदत रूपाने दिली आहे. भारतीय जवानाचा हा उपक्रम देशासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

शुभम साहेबराव बोरोडे हे सीआरपीएफ बटालियनच्या माध्यमातून देशाची सेवा सध्या बिहारमधील गया येथे करत आहेत. शुभम यांचा ७ जानेवारी रोजी संध्याकाळी अकोट येथे स्वागत समारंभ पार पडला. मंडपातील वातावरण अनंदासोबत देशभक्तीच्या भावनेने भारावून गेले होते. लग्नातील आनंदाच्या क्षणातही शुभम यांनी शहीद परिवाराच्या कुटुंबीयांना केलेल्या या अनोख्या संकल्पामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रसंगी माजी आमदार, संजय गावंडे, शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, काँग्रेसचे महेश गणगणे यांनी सदिच्छा भेट दिली.

---------------

वऱ्हाडींचा मिळाला प्रतिसाद

या नवरदेव जवानाने स्वतः १० हजार आणि लग्नातील वर-वधूच्या आशीर्वाद स्वरूपातील संपूर्ण रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबीयांना दिली. सोबतच लग्नसमारंभात एक सन्मानपेटी ठेवून वऱ्हाडी मंडळी व समाजाला मदतीचे आवाहन केले होते. या उपक्रमाला वऱ्हाडी मंडळींनीसुद्धा चांगला प्रतिसाद दिला.

Web Title: Soldier Navradeva's helping hand to the families of the martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.