पंचायत समितीतील त्या शिपायाची आत्महत्या नसून हत्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:16 AM2021-06-02T04:16:14+5:302021-06-02T04:16:14+5:30
पंचायत समितीचे शिपाई सुरेंद्र ज्योतीराव भोजने यांनी शासकीय निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली. मृतकाचा भाऊ सुरेश भोजने यांच्या तक्रारीनुसार ...
पंचायत समितीचे शिपाई सुरेंद्र ज्योतीराव भोजने यांनी शासकीय निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली. मृतकाचा भाऊ सुरेश भोजने यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत, पोलिसांनी तपास सुरू केला. गळफास घेतलेल्या घटनास्थळी रक्त सांडलेले दिसून आल्याने पोलिसांना संशय आला. मृतदेह अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला असता शवविच्छेदन अहवालात गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी तपासचक्रे फिरवून मोबाइलचे सीडीआर तपासून मृतकाच्या पुतण्यालाच ताब्यात घेतले. त्यानंतर काही तासांतच खरे मारेकरी समोर आले. मृतकाचा पुतण्या आकाश सुरेश भोजने (२०) रा. साईनगर तेल्हारा व त्याचा मित्र शेख रिजवान ऊर्फ फैजू निसार (२०) रा. गाडेगाव, ता. तेल्हारा या दोघांनी संगनमत करून सुरेंद्र भोजने यांची हत्या केली. तशी कबुलीही त्यांनी पोलिसांना दिली.
म्हणून हत्त्येचा कट रचला
मृतक सुरेंद्र भोजने याने २९ मे रोजी आरोपी आकाश भोजने याच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडिलांना शिवीगाळ केली होती. काकाने आई-वडिलांना शिवीगाळ केल्याने आकाश संतापला होता. त्याला आई-वडिलांचा अपमान सहन न झाल्याने त्याने काकांच्या हत्येचा कट रचला.
अशी केली काकाची हत्या!
२९ मे रोजी रात्री ११ वाजेनंतर दोन्ही आरोपी सुरेंद्र भोजने यांच्या घरी गेले व त्यांचा दोरीने गळा आवळून हत्या केली. सुरेंद्र भोजने यांनी आत्महत्या केल्याचा बनाव करून मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत टांगून ठेवला. पोलिसांनी दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली. सदर प्रकरणात प्रभारी उपविभागीय अधिकारी संतोष महल्ले, स्थानिक गुन्हे शाखेचे शैलेश सपकाळ, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, तपास अधिकारी पीएसआय गणेश कायंदे यांनी तपास करीत दोन दिवसांतच सदर प्रकरणाचा छडा लावला.