वीज देयक वितरणाचा घोळ
By admin | Published: May 18, 2017 12:57 AM2017-05-18T00:57:16+5:302017-05-18T00:57:16+5:30
देयक नाही, तर पैसे भरणार कसे: वीज ग्राहक संभ्रमात
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील वीज ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे रिडिंग घेऊन त्यांना वीज देयक वितरित करण्यासाठी महावितरणकडून एका संस्थेला कंत्राट देण्यात आले आहे; परंतु सदर कंत्राटदार संस्थेने वीज देयक वितरणाचा मोठा घोळ घालून ठेवल्याने शहरातील अनेक वीज ग्राहकांना देयके मिळतच नसल्याचे वास्तव आहे. वीज देयकच नाही, तर महावितरणकडे कोणत्या आधारावर पैसे भरणार आणि पैसे भरले नाही, तर महावितरणकडून वीज पुरवठा खंडित होणार, अशा संभ्रमात शहरातील वीज ग्राहक सापडले आहेत.
महावितरणकडून वीज ग्राहकांना अखंडितपणे वीज पुरवठा केला जातो. या वीज वापरापोटी त्यांच्याकडून देयकही वसूल केले जाते. ग्राहकांनी किती युनिट वीज वापर केला, याचे मीटर रिडिंग घेऊन त्यानुसार वीज देयके पाठविली जातात. वीज ग्राहकांच्या मीटरमधील युनिटचे रिडिंग घेणे व ती माहिती महावितरणकडे सादर करणे, तसेच महावितरणकडून मिळालेली वीज देयके, मीटर क्रमांकानुसार त्या-त्या ग्राहकांपर्यंत पोहोचविणे या कामासाठी महावितरणकडून कंत्राट दिले जाते. गतवर्षी अमरावती येथील एका एजन्सीला हे कंत्राट देण्यात आले होते. त्या एजन्सीनेही वीज देयक वितरणात मोठा घोळ घालून ठेवला होता. आता नवीन आर्थिक वर्षात एका बचत गटाला हे कंत्राट देण्यात आले आहे. सदर कंत्राटदार बचत गटाकडून तरी देयक वितरणाच्या परिस्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती; परंतु ती सपशेल फोल ठरली. शहरातील मुख्यत्वे जठारपेठ, खेळकर नगर, जवाहर नगर, रणपिसे नगर, राऊतवाडी, सावंतवाडी, उमरी या भागातील वीज ग्राहकांना गत दोन महिन्यांपासून वीज देयके मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. वेळेवर वीज देयक मिळत नसल्याने अनेक ग्राहकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. मुदतीच्या आत देयक भरले नाही, तर महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटिस पाठविल्या जातात. वीज देयकेच प्राप्त झाले नाही, तर पैसे भरणार कसे, असा प्रश्न वीज ग्राहकांना पडला आहे.
महावितरण म्हणते, ग्राहक सुविधा केंद्रावर या!
वीज देयक मिळत नसल्याने अनेक वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. वापरलेल्या विजेचे पैसे प्रामाणिकपणे भरणारे वीज ग्राहक वीज देयकांबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी करतात; परंतु त्यांना समाधानकारक उत्तर दिले जात नाही. वीज देयक मिळाले नाही, तर ते महावितरणच्या ग्राहक सुविधा केंद्रांवरून घेऊन जा किंवा वीज बिलाची माहिती मोबाइलवर एसएमएसद्वारे मिळावी, यासाठी मोबाइल क्रमांकाची नोंदणी करा, असे सांगण्यात येते.
महावितरणलाही फटका
शहरात प्रामाणिकपणे वीज बिल भरणारे ग्राहक आहेत; परंतु त्यांच्यापर्यंत वीज बिल पोहोचलेच नाही, तर ते पैसे भरणार कसे, एकीकडे वसुलीसाठी मोहिमा राबविल्या जातात, तर दुसरीकडे ग्राहकांपर्यंत देयकच पोहोचत नाही. यामुळे महावितरणलाही आर्थिक फटका बसतो; परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.