मनपा हद्दवाढीतील जिल्हा परिषद शाळांच्या हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:21 AM2021-08-15T04:21:27+5:302021-08-15T04:21:27+5:30
अकोला: महानगरपालिका हद्दवाढीतील जिल्हा परिषद शाळा मनपाकडे हस्तांतरित करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या येत्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्याचे ...
अकोला: महानगरपालिका हद्दवाढीतील जिल्हा परिषद शाळा मनपाकडे हस्तांतरित करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या येत्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्याचे सांगत, सर्वसाधारण सभेत ठराव नामंजूर झाल्यास शाळा हस्तांतरणाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठवून, शाळा हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सभेत जिल्हा परिषद प्रशासनाला दिले.
मनपा हद्दवाढीच्या क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या शाळा गत आठ वर्षांपासून अद्यापही मनपाकडे हस्तांतरित करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे शाळा हस्तांतरित करण्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी माजी महापौर तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजय अग्रवाल यांनी सभेत केली. तसेच मनपा हद्दवाढीच्या क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांचे हस्तांतरण अद्याप झाले नसल्याने शाळांसाठी प्राप्त झालेला १५ कोटी रुपयांचा निधी पडून आहे. त्यामुळे मनपा हद्दवाढ क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांचे हस्तांतरण केव्हा होणार, असा प्रश्न आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषदेच्या शाळा मनपाकडे हस्तांतरित करण्यासाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेचा ठराव आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी नीमा अरोरा व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले. तसेच मनपा हद्दवाढीतील जिल्हा परिषदेच्या शाळा मनपाकडे हस्तांतरित करण्याचा ठराव यापूर्वी ५ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नामंजूर करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सभेत दिली. त्यानुषंगाने शाळा हस्तांतरित करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या येत्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवून मंजुरी घेण्यात यावी. सर्वसाधारण सभेत ठराव नामंजूर झाल्यास, शाळा हस्तांतरणाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.
अकरावीत प्रवेशापासून एकही
विद्यार्थी वंचित राहू नये!
इयत्ता दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश देण्याची क्षमता आणि प्रवेश प्रक्रियासंदर्भात शिक्षण विभागाने आढावा घेण्याची मागणी आ. डाॅ. रणजीत पाटील यांनी सभेत केली. त्यानुषंगाने यासंदर्भात आढावा घेऊन अकरावी प्रवेशापासून जिल्ह्यात एकही विद्यार्थी वंचित राहता कामा नये, असे निर्देश पालकमंत्र्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले.
अशोक वाटिका सौंदर्यीकरणाच्या
कामाचे अंदाजपत्रक तयार करा!
अकोला शहरातील अशोक वाटिका परिवर्तनवादी विचारधारेच्या अनुयायांची प्रेरणाभूमी असून, पुरोगामी चळवळीचे केंद्र आहे. त्यामुळे अशोक वाटिका येथे अद्ययावत सभागृह, आवारभिंत व परिसर सौंदर्यीकरण आदी विकासकामे करण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा भोजने यांनी सभेत केली. त्यानुषंगाने अशोक वाटीका सौदर्यीकरणाच्या विकासकामांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले.