खारपाणपट्ट्यातील गावांच्या समस्या सोडवा! - ग्रामस्थांनी मांडल्या व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 02:15 PM2019-06-03T14:15:02+5:302019-06-03T14:16:06+5:30
अकोला: खारपाणपट्ट्यातील जनतेला प्रामुख्याने भेडसावणाºया समस्या तातडीने निकाली काढण्याची मागणी सात गावांतील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे दिलेल्या भेटीदरम्यान केली.
अकोला: खारपाणपट्ट्यातील जनतेला प्रामुख्याने भेडसावणाºया समस्या तातडीने निकाली काढण्याची मागणी सात गावांतील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे दिलेल्या भेटीदरम्यान केली. त्या समस्या निकाली काढण्यासाठी संबंधितांना तेथेच निर्देश देण्यात आले. काही समस्या प्रशासकीय बाबींची पूर्तता केल्यानंतर निकाली काढण्यात येतील, असा विश्वासही ग्रामस्थांसमोर व्यक्त करण्यात आला.
अकोला तालुक्यातील म्हातोडी, आपोती बु., आखतवाडा, आपातापा, कौलखेड गोमाशे, कपिलेश्वर, वडद बु., या गावांच्या दुष्काळग्रस्त व पाणीटंचाई निवारण करण्यासाठी थेट ग्रामस्थांसोबत संवाद साधण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आमदार रणधीर सावरकर, माजी मंत्री दशरथ भांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह प्रकाश रेड्डी, गणेश अंधारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी राहुल शेळके, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे, भूसंवियचे मेंढे, विस्तार अधिकारी मदन सिंग बहुरे, दीपक इंगळे यांच्यासह कर्मचारी, ग्रामसेवक उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी पाणीटंचाई निकाली काढण्यासाठी कायमस्वरूपी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत उपाययोजना कराव्या, तसेच ६४ खेडी योजनेतून पुरवठ्याची मागणी केली. म्हातोडी येथे वान प्रकल्पातून कायमस्वरूपी पाणी पुरवठा करावा, आपोती बुद्रूक येथे जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी एक टँकर जादा सुरू करणे, गावातील प्रत्येक वॉर्ड, गल्लीत टँकर पाठवावा, प्रत्येक कुटुंबाला सारखे पाणी मिळावे, त्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांनी नियोजन करावे, गावांमध्ये मनरेगामधून एक सार्वजनिक काम सुरू करणे, त्यांचे मस्टर काढणे, घरकुल बांधकाम प्रत्येक गावात सुरू करणे, घरकुलासाठी जागेची समस्या आहे, त्यांचे प्रस्ताव सादर करणे, वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम मनरेगामधून करणे, नाला खोलीकरण व रुंदीकरण करणे, जिल्ह्यात प्रत्येक प्रकारचे बियाणे व खत भरपूर प्रमाणात साठा उपलब्ध आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा काळाबाजार होणार नाही, पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करण्याचे आवाहन करण्यात आले. आपातापा गावातील पिण्याच्या पाण्याचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला जाणार आहे.
- नाला खोलीकरण, रुंदीकरण करणे, शेततळे खोदणे, शेतरस्त्याची कामे करणे, विहीर पुनर्भरणाचे काम सुरू करणे, गावातील रस्ते करणे, गुरांना चारा उपलब्ध करून देणे या मागण्याही ग्रामस्थांनी केल्या. त्यावर दुष्काळी भागात तातडीने उपाययोजना केल्या जातील, असे अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी सांगितले.
- गुरांना पुरेसा चारा उपलब्ध करून देण्यासाठी चारा डेपो, कायमस्वरूपी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करू, असे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले. सोबतच म्हातोडी गावाला जलशुद्धीकरण यंत्रणा आमदार निधीतून उपलब्ध केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.