६४ गावांतील पाणीपुरवठ्याच्या अडचणी तातडीने निकाली काढा
By संतोष येलकर | Published: April 17, 2023 09:06 PM2023-04-17T21:06:06+5:302023-04-17T21:06:15+5:30
आमदार रणधीर सावरकर यांचे निर्देश : जिल्हा परिषद ‘सीइओं’च्या दालनात घेतली बैठक
अकोला: खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत ६४ गावांतील पाणीटंचाइच्या प्रश्नावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीइओ) दालनात संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत, सर्वसामान्य ग्रामस्थांच्या वेदना समजून, पाणीपुरवठ्याच्या अडचणी तातडीने निकाली काढण्याचे निर्देश भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांनी सोमवारी दिले.
अकोला तालुक्यातील ६४ गावांच्या खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत आगर, उगवा व घुसर परिसरातील ग्रामस्थांना पाणीटंचाइ समस्येचा सामना करावा लागत असल्याच्या प्रश्नावर आमदार रणधीर सावरकर यांनी सोमवार, १७ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या समवेत जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण व वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली.
खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावातील पाणीपुरवठ्याच्या अडचणी समजून घेवून तातडीने समजून घेवून तातडीने निकाली काढण्याचे सांगत, जनतेच्या समस्या सोडविण्यासह विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस कटिबध्द असून, जिल्हा परिषदेने प्रस्ताव दिल्यास आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची ग्वाही आ.सावरकर यांनी दिली. ६४ गावांमध्ये पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने, ग्रामस्थांना पाणीटंचाइ समस्येचा सामना करावा लागत असून, भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना त्रास होणार नाही, यासाठी उपाययोजना करुन, टंचाइग्रस्त गावांमध्ये तातडीने टॅंकरव्दारे पाणीपुरवठा सुरु करण्यात यावा, पाणीपुरवठा योजनेसाठी नवीन पंप बसविण्यात यावे, अशा उपाययोजना करण्याचे निर्देशही आ.सावरकर यांनी दिले. यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह अकोला तालुक्यातील विविध गावांचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंचांनी वाचला पाणीटंचाइ समस्येचा पाढा
आमदार रणधीर सावरकर यांनी पाणीटंचाइ प्रश्नावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या समवेत घेतलेल्या संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध गावांचे सरपंच आणि ग्रामस्थरांनी खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांमधील पाणीटंचाइ समस्येचा पाढा वाचला.