मुलाने केली आईची २६ लाखांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 19:59 IST2021-04-17T19:59:02+5:302021-04-17T19:59:08+5:30
Son cheats mother by Rs 26 lakh : जॉइंट अकाउंटमधून त्याने ही २६ लाखांची रक्कम परस्पर वळती केल्याचे तक्रारीत म्हणणे आहे.

मुलाने केली आईची २६ लाखांनी फसवणूक
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आसरा कॉलनी येथील रहिवासी असलेल्या एका मुलाने आईची सुमारे २६ लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आईच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आई व मुलाच्या जॉइंट अकाउंटमधून त्याने ही २६ लाखांची रक्कम परस्पर वळती केल्याचे तक्रारीत म्हणणे आहे.
आसरा कॉलनी येथील रहिवासी रुक्मिणी सुभाष साठे या सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांच्या मालकीचे अंबिकानगर येथे घर आहे. हे घर मुलाने विक्री काढून अर्धे पैसे आईला देतो, अर्धे स्वतःजवळ ठेवतो असे म्हणून घर विक्रीला काढले. त्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी आगर येथील दत्तात्रय गुलाबराव वावरे यांच्याशी हे घर विक्रीचा व्यवहार झाला. त्यानंतर दत्तात्रय वावरे यांनी ३७ लाख ५० हजार रुपयांना हे घर विकत घेतले. रुक्मिणी साठे यांचा मुलगा कपिल साठे यांनी ही रक्कम ठेवण्यासाठी गांधी रोडवरील महाराष्ट्र बँकेत रुक्मिणी साठे व मुलगा कपिल साठे यांच्या नावाने जॉइंट अकाउंट काढले. या खात्यात ही रक्कम जमा ठेवणार असल्याचे त्याने आईला सांगितले. मात्र त्यानंतर कपिलने आईला काहीही माहिती न देता २६ फेब्रुवारी रोजी १५ लाख ५० हजार रुपये खात्यातून काढून घेतले. त्यानंतर ११ लाख रुपयांची रक्कम पत्नीच्या खात्यात आरटीजीएसद्वारे पाठविली. हा प्रकार कपिलची आई रुक्मिणी साठे यांना कळताच त्यांनी कपिलला यासंदर्भात विचारणा केली; मात्र त्याने काहीही उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याने रुक्मिणी साठे यांनी या प्रकरणाची तक्रार खदान पोलीस ठाण्यात केली. मुलाने फसवणूक करून विश्वासघात केल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. यावरून खदान पोलिसांनी चौकशी करून रुक्मिणी साठे यांचा मुलगा कपिल साठे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४०६ नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.