अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला क्रिकेट पंच; बीसीसीआय नॅशनल पॅनलवर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 01:09 PM2018-10-16T13:09:11+5:302018-10-16T13:11:49+5:30
-नीलिमा शिंगणे -जगड अकोला : खेळाप्रती प्रेम आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी या गुणांच्या बळावर शेतकऱ्याच्या मुलाने क्रिकेट पंचाची परीक्षा ...
-नीलिमा शिंगणे -जगड
अकोला: खेळाप्रती प्रेम आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी या गुणांच्या बळावर शेतकऱ्याच्या मुलाने क्रिकेट पंचाची परीक्षा उत्तीर्ण केली. या मुलांची बीसीसीआय नॅशनल अंपायर पॅनलवर निवड झाली आहे. या मुलाचे नाव आहे मयूर माधवराव वानखडे.
विदर्भातील नागपूर येथे देशातील १,४०० क्रिकेट पंचाची परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात आली होती. यामधून केवळ १७ उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली. यामध्ये महाराष्ट्रातील तीन जणांचा समावेश आहे. दोन मुंबईचे आणि एक अकोल्याचा मयूर. मयूरला लहानपणापासून क्रिकेट खेळाडू होण्यापेक्षा पंच म्हणून कामगिरी क रावी, असे वाटत होते. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पंच होण्याकरिता अकोला क्रिकेट क्लब येथे प्राथमिक धडे घेतले. भारत विद्यालय आणि जागृती विद्यालय येथे शालेय शिक्षणानंतर पुणे येथील एमआयटीमध्ये शिक्षण घेऊन बी.ई. (कॉम्प्युटर) पदवी घेतली; मात्र क्रिकेट पंच होण्याचे स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्याने पूर्णवेळ क्रिकेट पंच होण्यासाठी अभ्यासाकरिता दिला. मयूरचे वडील माधवराव शेती करतात. आई अरुणा जिल्हा परिषदमध्ये शिक्षिका आहे. आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे मयूर क्रिकेटकडे लक्ष देऊ शकला.
मयूरने आतापर्यंत १५० क्रिकेट सामन्यात पंच म्हणून काम केले आहे. यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा समावेश आहे. जून २०१३ मध्ये पहिल्यांदा पुणे जिल्हा असोसिएशनच्या सामन्यांमध्ये पंच म्हणून मयूरने काम केले. २०१४ मध्ये श्रीविष्णू तोष्णीवाल चषक, २०१५ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेट पॅनल परीक्षा उत्तीर्ण केली. २०१६ मध्ये बीसीसीआय लेव्हल वन परीक्षा उत्तीर्ण केली. २०१७ मध्ये बीसीसीआय रिफ्रेशर परीक्षा, जून २०१८ मध्ये बीसीसीआय लेव्हन टू परीक्षा (थेअरी) उत्तीर्ण होऊन प्रात्यक्षिकसाठी पात्रता सिद्ध केली. आॅक्टोबर २०१८ मध्ये बीसीसीआय लेव्हल टू परीक्षेत सर्वाधिक गुणांनी यश मिळवून, बीसीसीआयच्या नॅशनल पॅनलमध्ये अंपायर म्हणून मयूरची निवड झाली. या निवडीबरोबरच मयूरचे उच्च कोटीचे क्रिकेट अंपायर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. स्टीव्ह बकनोर, डेव्हीड शेफर्ड, श्रीनिवास व्यंकटराघवन यासारख्या उच्च कोटीचा अंपायर मयूरला व्हायचे आहे.
‘माझ्या यशामध्ये माझी आई, वडील आणि पत्नीचा मोठा वाटा आहे. हे तिघेही माझ्या जीवनाचे स्तंभ आहेत. ’
-मयूर वानखडे, क्रिकेट अंपायर