आलेगाव येथील शेतकऱ्याचा मुलगा झाला सीए!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:23 AM2021-09-17T04:23:54+5:302021-09-17T04:23:54+5:30
आलेगावातील सुरेश भंसाली हे शेतकरी आहेत. त्यांचा मुलगा यश याने पहिल्याच प्रयत्नात सीए फायनलची परीक्षा उत्तीर्ण केली. इयत्ता दहावी ...
आलेगावातील सुरेश भंसाली हे शेतकरी आहेत. त्यांचा मुलगा यश याने पहिल्याच प्रयत्नात सीए फायनलची परीक्षा उत्तीर्ण केली. इयत्ता दहावी परीक्षेतही त्याने ९० टक्के गुण मिळविले, परंतु त्याने विज्ञान शाखेकडे न जाता, वाणिज्य शाखेची निवड केली. बारावी परीक्षेतसुद्धा त्याने घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर त्याने सीए (सनदी लेखापाल) व्हायचे ठरविले आणि त्याने दिशेने वाटचाल सुरू केली. पुढील शिक्षण अकोला शहरात घेतले. दरम्यान, त्याच्या आईवडिलांचा भीषण अपघात झाला. यातून ते बचावले. जखमी झालेल्या आईवडिलांची यशने रात्रंदिवस काळजी घेतली. त्यांची सेवा करीत, त्याने अभ्यास केला. संकट आल्यावरही तो डगमगला नाही. सीए परीक्षेची तयारी चालू ठेवली. परिवाराच्या प्रेरणेने त्याने आलेगावमधून अवघ्या २३ व्या वर्षी अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या सीए (सनदी लेखापाल) परीक्षा पास करण्याचा पहिला बहुमान मिळविला. आलेगावातील अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवला आहे. परंतु सीए परीक्षेत उत्तीर्ण होणारा यश सुरेश भंसाली (जैन) हा पातूर तालुक्यातील पहिला विद्यार्थी आहे. यशचे वडील सुरेश प्यारेलाल भंसाली (जैन) हे आलेगाव येथील नूतन विद्यालय व गुरू गणेश मिश्री कनिष्ठ महाविद्यालयाचे खजिनदार आहेत.
फोटो: