सोनाळ्यात सोनाजी महाराजांचा गजर
By admin | Published: November 28, 2015 02:43 AM2015-11-28T02:43:12+5:302015-11-28T02:43:12+5:30
संत सोनाजी महाराज यात्रा महोत्सवात हजारो भाविकांनी घेतला पंगतीमध्ये महाप्रसाद.
चंद्रप्रकाश कडू / सोनाळा (जि. बुलडाणा) : संत सोनाजी महाराजांचा गजर व नामघोषात रथोत्सव सोनाळा येथे झेंडूची फुले व रेवडीच्या उधळणीत २७ नोव्हेंबर रोजी साजरा झाला. या रथोत्सवासाठी सोनाळासोबतच परिसरातील व जिल्हय़ातील हजारो भाविक उपस्थित होते. संत सोनाजी महाराज रथोत्सवाला २६ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजता सुरुवात झाली तर सांगता २७ नोव्हेंबर रोजी दुपारी हभप मधुकर महाराज साबळे यांच्या काल्याचे कीर्तन व दहीहंडीने झाली. संपूर्ण गावातून हा रथोत्सव काढण्यात आला. २६ रोजी रात्री संत सोनाजीच्या गजराने सोनाळा गाव दुमदुमले होते. नवस पूर्ण झाल्यावर रथाला नारळाचे तोरण बांधण्याची पूर्वापार परंपरा येथे जपल्या जाते. त्यामुळे यावर्षीही मोठय़ा प्रमाणात भाविकांनी तीन मजली रथाला नारळाची तोरणे बांधली होती. तसेच झेंडूच्या फुलांनी रथ सजविण्यात आला होता. मनोकामना पूर्ण झालेल्या भाविकांनी रथावर झेंडूच्या फुलांची तसेच रेवड्यांची उधळण केली. गावात घरोघरी सडासंमार्जन व रांगोळ्या काढून भक्तिभावात रथाचे पूजन करण्यात आले. या रथोत्सवात गावोगावातून आलेल्या भजनी दिंडी टाळ-मृदुंगासह सहभागी झाल्या होत्या. २६ च्या रात्री प्रकाशबाबा मंदिरात रथ ठेवण्यात येऊन २७ रोजी परत रथयात्रा सुरू झाली. गावातून मार्गक्रमण केल्यानंतर या रथयात्रेचे दुपारी परत संत सोनाजी महाराज मंदिरात आगमन होऊन महाआरती झाली. महाआरतीनंतर बाळाबाप्पू देशमुख यांच्या शेतात शिस्तबद्धपणे पंगतीत बसवून हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यशस्वीतेसाठी संत सोनाजी महाराज संस्थान विश्वस्त गेल्या दोन महिन्यांपासून परिश्रम घेत आहेत. १११ पोते ज्वारीपासून महाप्रसाद ४यात्रेचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे महाप्रसाद असतो. यावर्षी १११ क्विंटल ज्वारीच्या भाकरी, २१ क्विंटल उडिदाची दाळ व अंबाडीची भाजी असे नियोजन करण्यात आले होते. जिल्हय़ातील खा. प्रतापराव जाधव, आ.डॉ. संजय कुटे, आ.अँड. आकाश फुंडकर, जि.प. सदस्य डॉ. वासुदेव गावंडे या लोकप्रतिनिधींसोबतच प्रसेनजित पाटील, डॉ. केला, विजयकुमार भुतडा आदींसह इतरांनीही सहभागी होऊन दर्शन तसेच महाप्रसाद घेतला.