स्त्रीरोग विभागातील सोनोग्राफी मशीन बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:28 PM2019-11-19T12:28:21+5:302019-11-19T12:28:27+5:30
सोनोग्राफीसाठी गर्भवतींना जिल्हा स्त्री रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याचे उत्तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागातील सोनोग्राफी मशीन बंद पडली आहे. त्यामुळे गत अनेक दिवसांपासून येथे येणाऱ्या गर्भवतींना सोनोग्राफीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात जिल्ह्यातीलच नव्हे, तर शेजारील जिल्ह्यातील रुग्ण व गर्भवती मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात; परंतु येथील महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे नादुरुस्त असल्याने रुग्णसेवा प्रभावित होत आहे. असाच काहीसा प्रकार स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागातील असून, गत काही महिन्यांपासून येथील सोनोग्राफी मशीन नादुरुस्त आहे. परिणामी वैद्यकीय तपासणीसाठी येणाºया गर्भवतींना केवळ सोनोग्राफीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयाची वाट दाखविली जाते. त्यामुळे गर्भवतींना नाइलाजास्तव हेलपाटे घेत जिल्हा स्त्री रुग्णालयात जावे लागते. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे महानगराध्यक्ष आशीष सावळे यांनी अनेकदा तक्रार दिली आहे; परंतु मशीन बंद असल्याने सोनोग्राफीसाठी गर्भवतींना जिल्हा स्त्री रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याचे उत्तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे देण्यात आले.
कंपनीकडून जीएमसीला प्रतिसाद नाही!
गत काही महिन्यांपासून येथील सोनोग्राफी मशीन बंद असल्याची तक्रार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे संबंधित कंपनीकडे करण्यात आली आहे; परंतु यापूर्वी मशीन दुरुस्तीची थकबाकी अदा न करण्यात आल्याने कंपनी जीएमसी प्रशासनाला प्रतिदास देत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.