सोनोरी गावात अज्ञात आजाराची साथ; घराघरात रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 01:43 PM2018-09-24T13:43:37+5:302018-09-24T13:46:53+5:30
मूर्तिजापूर : तालुक्यातील सोनोरी गावात अज्ञात आजाराची साथ पसरली असून, घराघरात रुग्ण आढळून येत आहेत.
- संजय उमक
मूर्तिजापूर : तालुक्यातील सोनोरी गावात अज्ञात आजाराची साथ पसरली असून, घराघरात रुग्ण आढळून येत आहेत. गत पंधरा दिवसांपासून गावात अज्ञात आजाराने थैमान घातले असून गावातील निम्म्या लोकांना या आजाराची लागण झाल्याने आरोग्य विभाग खळबळून जागा झाला असला तरी दिवसेंदिवस रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
सोनोरी येथील काही नागरिकांमध्ये थंडी ताप,डोके दुखी, अशक्तपणा, मळमळ, अतीसार, छातीची धडधड वाढणे, आदी लक्षणे दिसून येत आहेत. थोडी कणकण असेल म्हणून सुरुवातीला या बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले; परंतु हिच लक्षणे अनेक लोकांत दिसायला लागल्यानंतर या बाबत कुरुम प्राथमिक आरोग्य केंद्रात माहीती देण्यात आली. संबंधित विभागाने सोनोरी गाव गाठून तपासणी केल्यानंतर मंगळवार १८ सप्टेंबर रोजी काही रुग्णांना मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करुन त्यांना सुट्टी देण्यात आली होती. परंतु २३ सप्टेंबर रोजी सुट्टी झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांच्यासह ३५ ते ४० रुग्णांना रात्री उशिरा पर्यंत रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले, सर्वच रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. तर अनेक जण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे.
सोनोरी येथील विजय प्रभाकर काळे, नारायण ढाकरे व रजनी दिपक काळे यांच्यावर अकोला, अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पैकी विजय काळे हे अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात अती दक्षता विभागात उपचार घेत त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना उपचारासाठी नागपूर येथे घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. नारायण ढाकरे यांना डेंग्यूची लागण झाली असून, प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना २३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सुट्टी देण्यात आली. तर रंजना काळे यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सोनोरी येथील रुग्णांसाठी खास वार्ड
विचित्र आणि अज्ञान आजाराची लागण झालेल्या सोनोरी गावातील आजारी नागरीकांसाठी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात एक खास वार्ड ची निर्मिती करण्यात आली आहे. याच वार्डात स्त्री - पुरुष रुग्णांवर एकत्र उपचार करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयात सुत्रांनी दिली.
आतापर्यंत लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात सोनोरी येथील ३९ रुग्ण दाखल झाले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू असुन यामधे गंभीर आजारी कोणी नाही. सदर आजार किटकजन्य फिवर असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास येते याबाबत रुग्णांचे रक्त नमुने घेतले असून तो अहवाल आल्यानंतर रोग निदान निश्चित होईल. स्क्रब टायफस चे लक्षणे आढळून आले नाही. उपचारासाठी रुग्णालयाची टिम सज्ज असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
- डॉ. आर. एम. नेमाडे
वैद्यकीय अधिक्षक,लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात, मूर्तिजापूर.
गत चार दिवसांपासून सोनोरी गावात आमचे पथक ठान मांडून आहे. गावातील पाण्याचे कंटेनर साफ करण्यात आले आहे. सदर गावचा सर्व्हे करण्यात आला असता ७९ रुग्ण अज्ञात आजाराने ग्रस्त असल्याचे आढळून आले त्यांना योग्य उपचारासाठी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका रुग्णाला स्वाईन फ्लू झाल्याचे आढळून आले असून तो अमरावती येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
- डॉ. सचिन नळे
तालुका आरोग्य अधिकारी, मूर्तिजापूर
पसरलेला आजार हा जलजन्य नसून किटक जन्य असावा पाण्याचे नमूने घेऊन तपासणीसाठी संबंधित विभागला पाठविण्यात आले आहे.
- डॉ. अतुल शंकरराव
वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, कुरुम.
गावात ग्रामपंचायतची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना असून ज्या विहीरीतून पाणीपुरवठा केला जातो ती नदी काठावर आहे. नदीचे पाणी पाझरुन विहीरत जात असावे. ग्रामपंचायत मार्फत ब्लिचिंग टाकल्या जात आहे.
मंगला बाळू इंगळे
सरपंच, सोनोरी